loader
Foto

अमेरिका म्हणतेय, भारतापेक्षा पाकिस्तान अधिक सुरक्षित!

दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असणारा पाकिस्तान हा अमेरिकेच्यालेखी भारतापेक्षा काही प्रमाणात अधिक सुरक्षित आहे. अमेरिकन नागरिकांसाठी जारी करण्यात आलेल्या प्रवास निर्देश यादीत अमेरिकेने पाकिस्तानच्या श्रेणीत सुधारणा केली आहे. याआधी भारत, पाकिस्तान, सीरिया, इराक आदी देशांना अमेरिकेने चार इतके रेटिंग दिले होते. त्यातून आता पाकिस्तानला वगळण्यात आले असून तीन रेटिंग देण्यात आले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, भारतात प्रवास करणे अमेरिकन नागरिकांनी टाळायला हवे. भारतात करोनाचे संकट आहे. त्याशिवाय देशात गु्न्हेगारीच्या घटना आणि दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी भारतात प्रवास करू नये अशी सूचना देण्यात आली होती. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या निर्देशांमध्ये भारताबाबत याच सूचना कायम ठेवण्यात आल्या आहेत. तर, पाकिस्तानमधील प्रवासाबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी सूचना अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिली आहे. याआधी १० ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या यादीत भारत आणि पाकिस्तान एकाच श्रेणीत होते.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या श्रेणीत सुधारणा केली असली तरी दहशतवादी घटना आणि अपहरणाच्या घटनांमुळे बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ न जाण्याचा सल्ला अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिला आहे. करोनाबाधितांच्या संख्येत घट आढळून आली आहे. त्याशिवाय २०१४ नंतर पाकिस्तानमध्ये देशांतर्गत सुरक्षितेच्यादृष्टीने मोठी पावले उचलण्यात आली आहेत. पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने दहशतवाद आणि कट्टरवादाविरोधात मोठी मोहीम सुरू केली होती असेही अधिकाऱ्यांनी म्हटले.

Recent Posts