loader
Foto

अणवस्त्र साठा दुप्पट करण्याच्या तयारीत चीन; अनेक देशात उभारतोय लष्करी तळ!

चीनने अणवस्त्रांचा साठा दुप्पट करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. इतकंच नव्हे तर अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी इतर देशातही चीन आपले लष्करी तळ उभारत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. जागतिक महासत्ता बनण्यासाठी चीनकडून ही पावले उचलली जात असल्याचे म्हटले जात आहे.

चीन सध्या आक्रमक विस्तारवादी भूमिका घेत आहे. दक्षिण चीन समुद्र भागातही अमेरिका आणि चीनचे नौदल एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. तर, काही दिवसांपूर्वीच लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळला. या पार्श्वभूमीवर हा अहवाल समोर आला आहे. पेंटागॉनने आपल्या Military and Security Developments Involving The Peoples Republic of China 2020 या वार्षिक अहवालात म्हटले की, भारताच्या शेजारी असलेल्या तीन देशांसह जवळपास १२ देशांमध्ये आपला लष्करी तळ उभारण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे चीनला जगभरात दबदबा निर्माण करता येऊ शकतो. या अहवालानुसार, पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार या देशांसह थायलँड, सिंगापूर, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिरात, केनिया, सेशल्स, टांझानिया, अंकोला आणि ताजिकिस्तान या देशांमध्ये चीन आपला लष्करी तळ उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

पेंटागॉनने म्हटले की, या ठिकाणांवरून नौदल, हवाई दल आणि सैन्यांच्या कारवाईला अधिक शक्तिशाली करण्यात येणार आहे. जगभरात पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैन्य ठिकाणांचे नेटवर्क हे अमेरिकेच्या लष्करी कारवाईमध्ये हस्तक्षेप करू शकतात. त्याशिवाय चीन अमेरिकेविरोधातील आक्रमक कारवाईचे समर्थन करू शकते.

Recent Posts