loader
Foto

थायलंडनेही चीनला दिला धक्का; अनिश्चितकाळासाठी 'हा' करार स्थगित

करोनाचा वाढता संसर्ग, देशातंर्गत वाढता असंतोष आणि आक्रमक विस्तारवादाविरोधात जगभरातून होत असलेल्या कोंडीत अडकलेल्या चीनला थायलंडनेही धक्का दिला आहे. भारताने ११८ चिनी अॅपसवर बंदी घातली असताना आता थायलंडने चीनसोबत झालेल्या पाणबुडी खरेदीच्या करारावर स्थगिती आणली आहे. इतकंच नव्हे तर या पाणबुडींसाठी देण्यात येणारी आगाऊ रक्कम देण्यास नकार दिला आहे.

थायलंडने चीनसोबत जून २०१५ मध्ये पाणबुडीच्या खरेदीसाठी चर्चा सुरू केली होती. त्यानंतर एका वर्षाच्या आत थायलंडचे पंतप्रधान प्रायुत चान-ओ-चा यांना सत्तेतून हटवून लष्कराने ताबा मिळवला. त्यानंतर चीन आणि थायलंडमधील मैत्री संबंध आणखी सुधारत गेले. त्याच्या परिणामी अमेरिकेने थायलंडवर अनेक निर्बंध लादले.

थायलंडच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने पहिल्या पाणबुडीच्या खरेदीसाठी २०१७ मध्ये मंजुरी दिली होती. त्यासाठी चीनला ४३४.१ दशलक्ष डॉलर इतकी रक्कम थायलंड देणार होता. ही पाणबुडी २०२३ च्या सुमारास मिळणार होती. मात्र, दोन युआन वर्गाची एस२६ टी डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी खरेदीबाबत चर्चा फिस्कटली. या पाणबुडींसाठी ७२०दशलक्ष डॉलरची मागणी चीनने केली होती. तर, ही रक्क्कम प्रचंड असल्याचे थायलंडने म्हटले.

ऑगस्ट महिन्यात थायलंडच्या संसदेत चीनकडून घेण्यात येणाऱ्या पाणबुडींची रक्कम सात वर्षात देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. ही रक्कम देशाच्या अर्थ संकल्पात जोडण्यात येणार होती. देशावर ओढावलेल्या गंभीर आर्थिक संकटानंतरही एवढा महागडा करार होत असल्याने थायलंड सरकारविरोधात आंदोलन सुरू झाले. सोशल मीडियावर #PeopleSayNoToSubs हॅशटॅगने ट्रेंड चालवण्यात आला. विरोधकांच्या आंदोलनानंतर सरकार बॅकफूटवर आले. त्यानंतर हा करार अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Recent Posts