loader
Foto

करोनाचे थैमान: जगभरातील आरोग्य व्यवस्थेबाबत WHO ने दिला 'हा' इशारा

करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील सुमारे २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक देशांच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. जगभरातील जवळपास ९० टक्क्यांहून अधिक देशांमधील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने मार्च ते जून या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास आरोग्य यंत्रणा उद्धवस्त होण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे. करोनाच्या संसर्गामुळे अनेक नियमित आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक असलेल्या तक्रारींचे निदान लांबणीवर पडले आहे. करोनाच्या महासाथीमुळे कर्करोगाच्या उपचारावर मोठा परिणाम झाला आहे. मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना सर्वाधिक अडचणींना सामना करावा लागू शकतो. निम्म्याहून अधिक देशांमध्ये गर्भनिरोध आणि कुटुंब नियोजन (६८ टक्के) मानसिक आरोग्याशी संबंधित असलेला उपचार (६१ टक्के) आणि कर्करोगाबाबतच्या उपचारांवर (५५ टक्के) परिणाम झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

लशीबाबत घाई केल्यास मोठे नुकसान
करोनाला अटकाव करणाऱ्या लशींना मंजुरी देण्याबाबतच्या प्रक्रियेला अधिक गंभीरपणाने घेण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी पत्रकारांना सांगितले की, सर्व देशांना लस चाचणी पूर्ण होण्याआधी मंजुरी देण्याचा अधिकार आहे. मात्र, अशा औषधांना, लशींना अगदी सहजपणे घेण्यासारख्या गोष्टी नाहीत. सध्या जगात ३३ लशींची क्लिनिकल चाचणी सुरू आहे. तर, १४३ लशी या प्री क्लिनिकल इव्हॅल्यूशनच्या टप्प्यात आहेत. जे देश लस चाचणीचे टप्पे पूर्ण न करता लशींना मंजुरी देत आहेत, त्यांना वाईट परिणामांनाही सामोरे जावे लागण्याची भीती असल्याचेही त्यांनी सांगितले. रशिया आणि चीन या दोन्ही देशांनी आपल्या लशींना परवानगी दिली आहे. आता या दोन देशांनंतर अमेरिकाही लशीला परवानगी देणार आहे. अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमुक स्टीफन हॉन यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Recent Posts