loader
Foto

ऑक्सफर्डच्या लशीची प्रतिक्षा संपणार; 'या' दिवशी होणार लाँचिंग!

जगभरातील जवळपास २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. जवळपास अडीच कोटींच्या घरात करोनाबाधितांची संख्या पोहचली आहे. करोनामुळे जगभरातील जनजीवन ठप्प झाले आहे. तर, दुसरीकडे संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ऑक्सफर्डच्या लशीबाबत ब्रिटनमधून चांगली बातमी समोर आली आहे. ही लस कधी लाँच होणार याबाबत ब्रिटन सरकारने माहिती दिली आहे. आगामी सहा आठवडे म्हणजे ४२ दिवसांमध्ये ही लस तयार होणार आहे. करोनावरील लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी ब्रिटन सरकार आता कायद्यातही बदल करणार आहे. त्यानुसार, शास्त्रज्ञांनी लशीच्या यशस्वीतेबाबत घोषणा केल्यानंतर ताबडतोब आपात्कालीन परिस्थितीत बाधितांना ही लस देण्यात येणार आहे.

सहा आठवड्यात लस तयार होणार!

ब्रिटनमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका ब्रिटीश अधिकाऱ्याने संडे एक्स्प्रेसला सांगितले की, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि इम्पिरिअल कॉलेजचे वैज्ञानिक लस बनवण्याच्या अंतिम टप्प्यात पोहचले आहेत. दोन्ही विद्यापीठांनी स्वतंत्रपणे विकसित केलेल्या लशीची वेगवेगळी चाचणी होत आहे. सर्व काही नियोजनानुसार पार पडले की, ऑक्सफर्डची लस आगामी सहा आठवड्यात बनवून तयार होणार आहे.

लशीबाबत घोषणा झाल्यानंतर काही महिन्यांतच मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. ब्रिटनच्या सर्वच नागरिकांना लस देण्याचे नियोजन असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे २०२१ मध्ये जनजीवन पु्न्हा एकदा वेगाने पूर्वपदावर येईल असा विश्वासही या अधिकाऱ्याने व्यक्त केला. सध्या ब्रिटन सरकार लॉकडाउनचे निर्बंध आणखी शिथिल करण्याबाबत बरीच खबरदारी बाळगत आहे.

Recent Posts