loader
Foto

प्रकृतीच्या कारणास्तव जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. शिंजो आबे हे प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील काही महिन्यांत त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिंजो आबे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत घोषणा केली आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान आबे यांनी सांगतिले की, मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आबे हे अल्सरेटिव कोलाइटिस या आजारावर उपचार घेत आहेत. त्यांनी सांगितले की, नवीन उपचार घेत आहे. त्यानुसार, नियमितपणे आरोग्य तपासणी आणि देखभालीची आवश्यकता आहे. उपचारांमुळे मी पंतप्रधान म्हणून कर्तव्य पूर्णपणे पूर्ण करू शकत नाही. लोकांनी बहुमत देऊन पुन्हा विश्वास दर्शवला होता. मात्र, पूर्ण क्षमतेनुसार आपण काम करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटीक पार्टी नव्या पंतप्रधानाची निवड करणार आहे.

शिंजो आबे हे मागील आठवड्यात दोन वेळेस रुग्णालयात दाखल झाले होते. सातत्याने रुग्णालयात उपचारासाठी जात असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी जवळपास सात तास आबे रुग्णालयात दाखल होते. आबे यांच्या पंतप्रधानपदाचा कार्यकाळ सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आबे राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. या चर्चेचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. जपानच्या शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.

मागील सोमवारी त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाची आठ वर्षे त्यांनी पूर्ण केली. जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ असणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत. करोनाच्या वाढत्या संसर्सामुळे त्यांच्या लोकप्रियतेतही घसरण दिसून आली. जवळपास ३० टक्के घट नोंदवण्यात आली. त्यांच्या सरकारवर आणि पक्षावर घोटाळ्यांचे आरोप करण्यात आले आहेत. आबे यांनी जपानची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर आणण्याचे आश्वासन दिले होते. तर, चीनचा संभाव्य धोका ओळखून त्यांनी आपल्या देशाच्या सैन्याला अधिक सुसज्ज करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.

Recent Posts