loader
Foto

Corona vaccine 'कोविड-१९'च नव्हे तर करोनाच्या सर्व आजारांवर लस येणार!

कोविड-१९ विषाणूवर मात करणाऱ्या लशीच्या निर्मितीत अनेक देश गुंतलेले असताना आता केंब्रिज विद्यापीठाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. करोना वर्गातील सर्वच विषाणूंवर परिणामकारक ठरणाऱ्या लशीसाठी संशोधन सुरू केले आहे. वर्षअखेरीपर्यंत त्याच्या चाचण्या सुरू करण्यात येतील, अशी माहिती विद्यापीठाच्यावतीने देण्यात आली आहे.

वटवाघळांसह अनेक प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या निरनिराळ्या करोना विषाणूंचा मानवाला भविष्यात धोका उद्भवू नये, यासाठी केंब्रिज विद्यापीठाकडून 'डायओस-कोवॅक्स२' असे नाव असलेली ही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही लस देण्यासाठी सुई न वापरता जेट इंजेक्शनच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. वर्षअखेरीस या लशीच्या मानवी चाचण्या सुरू करण्यात येणार आहे. या लशीच्या संशोधनासाठी ब्रिटन सरकारने १९ लाख पौंडाचे अर्थसहाय्य दिले आहे. तर डायोसिनवॅक्स कंपनी चाचण्यांसाठीचा ४ लाख पौंड खर्च उचलणार आहे.

सध्या काळाची तातडीची आवश्यकता म्हणून लस विकसित करताना अनेकांनी प्रस्थापित असलेली पद्धत वापरली आहे. या लशीच्या चाचण्या यशस्वी होतील, अशी आशा आहे. मात्र, प्रचंड यशस्वी लशींनाही मर्यादा असते. त्या काही नाजूक स्थितीतील काही व्यक्तींसाठी अयोग्य ठरू शकतात तसेच त्यांचा प्रभाव किती काळ राहील, याविषयीही निश्चित दावा करता येत नाही', असे डायोसिनव्हॅक्स कंपनीच्या सीओओ डॉ. रिबेका किन्सली यांनी स्पष्ट केले. सिथेंटिक डीएनएच्या वापराने करोनाविरोधात अधिक प्रभावी ठरेल अशी लस विकसित करण्याचा प्रयत्न आहे. अशाप्रकारे विकसित केलेली लस क्रांतीकारक बदल घडवू शकते. त्यामुळे ही लस कमी खर्चात उत्पादीत आणि वितरीत करता येऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

या लशीचे वैशिष्ट म्हणजे ती गोठवणाऱ्या तापमानात पावडर स्वरूपात जतन केली जाईल. यामुळे त्यावर उष्णतेचा परिणाम होणार नाही व ती शीतपेटीत ठेवण्याची गरज भासणार नाही. यामुळेच तिच्या वाहतूक व साठवणूक प्रक्रियेसाठी खर्च येणार नाही व जगातील गरीब व मध्यम आर्थिक गटातील देशांवर भार पडणार नाही.

दरम्यान, AstraZeneca कंपनी ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन करत आहे. सध्या करोनावरील सर्वाधिक आश्वासक लस म्हणून या लशीकडे पाहिले जात आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असून लवकरच निकाल अपेक्षित आहेत. भारतात सिरम इन्स्टिट्यूट या लशीचे उत्पादन करणार असून परवडणाऱ्या दरात ही लस भारतामध्ये उपलब्ध होणार आहे.

Recent Posts