loader
Foto

आनंदवार्ता...आफ्रिकाही झाला पोलिओ मुक्त; आता 'या' दोन देशांमध्येच पोलिओचा आजार

करोनाच्या संकटाशी दोन हात करत असताना जगासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झाला आहे. आफ्रिका खंड पोलिओमु्क्त झाला असल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. आफ्रिका खंडात नायजेरिया हा शेवटचा देशही पोलिओ मु्क्त जाहीर करण्यात आला. आफ्रिका रिजनल सर्टिफिकेशन कमिशनने याची घोषणा केली. याआधी जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रिका खंडातील सर्व ४७ देशांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. जगात दोन महत्त्वाचे देश अद्यापही पोलिओ मुक्त झाले नाही.

आफ्रिका खंडात वाइल्ड पोलिओचे शेवटचे प्रकरण चार वर्षांपूर्वी नायजेरियात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिका खंडातील विविध देशांचे सरकार, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रयत्न आणि समाजातील सर्व घटकांनी केलेल्या सहकार्यांमुळे १८ लाख बालकांना अंपगत्वापासून वाचवण्यात यश आले आहे. पोलिओमुळे पाच वर्षापर्यंतच्या बालकांना अपंगत्व येण्याचा धोका असतो.

जवळपास २५ वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात हजारो बालकांना पोलिओमुळे अपंगत्व आले होते. पोलिओला अटकाव करण्यासाठी लशीकरण मोहीम राबवण्यात आली. जगात आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पोलिओ आढळला जात आहे. या आजारावर कोणताही उपचार नाही. मात्र, पोलिओच्या लशीमुळे बालकांचे या आजारापासून संरक्षण होते.

आफ्रिका खंडात नायजेरिया हा पोलिओमुक्त होणारा शेवटचा देश ठरला आहे. जवळपास एक दशकांपूर्वी नायजेरियात जगातील सर्वाधिक पोलिओबाधित आढळत होते. त्यानंतर पोलिओ निमूर्लनासाठी मोठ्या प्रमाणावर लशीकरण मोहीम राबवण्यात आली. अतिशय दुर्गम भागात जाऊन अनेक वर्ष लशीकरण मोहीम राबवण्यात आली. यातील काही ठिकाणी सातत्याने हिंसाचार, दहशतवादी हल्ले सुरू होते. यामध्ये काही आरोग्य कर्मचारीदेखील ठार झाले. आफ्रिकेतील जवळपास ९५ टक्के लोकांमध्ये पोलिओविरोधी रोग प्रतिकारक क्षमता तयार झाली आहे. भारताला २०११ मध्ये पोलिओ मुक्त देश जाहीर करण्यात आले होते.

Recent Posts