loader
Foto

मस्तच..करोनावर लससोबत औषधही येणार; 'या' कंपनीकडून चाचणी सुरू

औषध निर्मिती कंपनी AstraZenecaने करोनाच्या लशीनंतर आता एका औषधाची चाचणी सुरू केली आहे. हे औषध कोविड-१९ पासूनच्या संसर्गापासून बचावही करणार असून उपचारातही मोठी मदत होणार आहे. या औषधाच्या चाचणीसाठी स्वयंसेवकांना औषधांचा डोस देण्यात आला आहे. AstraZenecaने याआधी ऑक्सफर्डसोबत AZD1222 या करोना लशीवर काम सुरू केले आहे. या लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आली आहे.

AstraZeneca ने सांगितले की ब्रिटनमध्ये होणाऱ्या चाचणीत १८ ते ५५ वयोगटातील ४८ निरोगी स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. औषध कितपत सुरक्षित आहे, शरीरावर याचा किती परिणाम होतो आदी विविध मुद्यांचा अभ्यास या चाचणीत केला जाणार आहे. ज्यांना करोना संसर्ग होण्याचा अधिक धोका आहे, अशांसाठी हे औषध उपयोगी ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याशिवाय ज्यांना करोनाची बाधा झाली आहे, त्यांच्या उपचारातही हे औषध उपयोगी ठरणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीचे बायोफार्मास्युटिकल रिसर्च अॅण्ड डेव्हलेपमेंटचे एक्झिक्युटीव्ह उपाध्यक्ष सर पँगलोस यांनी सांगितले की, अॅण्टीबॉडीटचे कॉम्बिनेशन, हाफ-लाइफ एक्सटेंशन तंत्रज्ञानासोबत अधिक मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घकाळासाठी परिणामकारक आहे. त्याशिवाय विषाणू या औषधाविरोधात आपली प्रतिकारक क्षमता वाढवणार नाही, याची दक्षता ही या औषधाद्वारे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

AstraZeneca कंपनी ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन करत आहे. सध्या करोनावरील सर्वाधिक आश्वासक लस म्हणून या लशीकडे पाहिले जात आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असून लवकरच निकाल अपेक्षित आहेत. भारतात सिरम इन्स्टिट्यूट या लशीचे उत्पादन करणार असून परवडणाऱ्या दरात ही लस भारतामध्ये उपलब्ध होणार आहे.

Recent Posts