loader
Foto

पाकव्याप्त काश्मीर: चीनच्या प्रकल्पाविरोधात स्थानिकांचे आंदोलन

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन सरकारच्या प्रकल्पाला स्थानिकांकडून जोरदार विरोध सुरू झाला आहे. मुझफ्फराबादमध्ये नीलम आणि झेलम नदींवर चीन बांधत असलेल्या धरणाला विरोध वाढत आहे. सोमवारी रात्री मोठ्या संख्येने लोकांनी मुझफ्फराबाद शहरात जोरदार मशाल रॅली आणि धरणाच्या बांधकामाविरोधात मोर्चा काढला.

चीनकडून झेलम आणि निलम नदीवर धरणाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असून पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याचे स्थानिकांनी म्हटले. स्थानिकांनी या बांधकामाच्या मुद्यावरून प्रशासनावर सडेतोड टीकाही केली. पाकिस्तानमध्ये ट्विटरवर #SaveRiversSaveAJK असा ट्रेंड चालवून लोकांनी आपला विरोध दर्शवला. नदींवर ताबा मिळवून पाकिस्तान आणि चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनी केला. या धरणाच्या बांधकामामुळे स्थानिक पर्यावरणासह इतरही मोठ्या समस्या निर्माण होणार असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

चीन आणि पाकिस्तान दरम्यान अब्जावधींचा करार झाला आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील कोहलामध्ये २.४ अब्ज डॉलरच्या हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी हा करार झाला आहे. हा प्रकल्प चीनच्या महत्त्वकांक्षी 'बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटीव्ह' प्रकल्पाचा भाग आहे. हा जलविद्युत प्रकल्प पूर्ण झाल्यास पाकिस्तानला कमी दरात वीज उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारताने चीनच्या 'बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटीव्ह' प्रकल्पालाविरोध केला आहे. या प्रकल्पातील रस्ता आणि काही प्रकल्पांची बांधकामे पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणार आहे. काश्मीर हा भारताचा हिस्सा असून चीनने या भागात बांधकाम न करण्याचे आवाहन भारताने केले होते. मात्र, चीनने याकडे दुर्लक्ष करत हा प्रकल्प दामटवला आहे. 'बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटीव्ह' प्रकल्पामुळे चीनला पाकिस्तान मार्गे आशिया आणि युरोपमधील देशांमध्ये वेगाने मालवाहतूक करणे शक्य होणार आहे.

Recent Posts