loader
Foto

Mali माली: राष्ट्रपती, पंतप्रधान बंडखोर सैनिकांच्या ताब्यात; राष्ट्रपतींचा राजीनामा

पश्चिम आफ्रिकन खंडातील देश मालीमधील राजकीय परिस्थिती बिघडली आहे. माली देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना बंडखोर सैनिकांनी ताब्यात घेतले आहे. बंडखोर सैनिकांनी केलेला सत्तापालटाचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले जाते. त्याआधी बंडखोर सैनिकांनी मंगळवारी राष्ट्रपतींच्या खासगी निवासस्थानाला घेरले होते. त्यावेळी हवेत गोळीबारही झाला असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रपती इब्राहिम बाउबकर कीता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त 'अल जझीरा'ने दिले आहे.

राष्ट्रपती इब्राहिम बाउबकर कीता यांनी राजीनामा दिल्यानंतर देशाला संबोधित करत आपण सत्तेतून पायउतार होत असल्याचे सांगितले. आज सैन्यातील काही जवानांनी हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे म्हटले. रक्तपात होऊ नये यासाठी माझ्याकडे राजीनामा देण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. मालीमधील संसंदही बरखास्त झाली आहे. याआधी २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत किता यांना बहुमत मिळाले होते. कोलमडलेली अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार आणि वाढलेली धर्मांधता यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता.

बंडखोर सैनिकांनी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. राजधानी बमाकोजवळील काटी शहरात गोळीबार झाला असल्याचा काहीजणांनी दावा केला आहे. 'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मालीमध्ये सैनिकांनी राष्ट्रपती इब्राहिम बाउबकर कीता आणि पंतप्रधान बाउबो सिसे यांना ताब्यात घेतले. या दोन्ही नेत्यांना राजधानी बामाकोमधील कीटा निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले.

 

'अल जझीरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, मागील काही दिवसांपासून मालीमध्ये विरोधकांचे आंदोलन सुरू आहे. देशाची अर्थव्यवस्था कोलमडण्यास आणि देशातंर्गत परिस्थिती आणखी बिघडवण्यास राष्ट्रपती इब्राहिम बाउबकर कीता आणि पंतप्रधान बाउबो सिसे यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मंगळवारी बंडखोर सैनिकांचे बमाकोच्या रस्त्यावर नागरिकांनी पाठिंबा व्यक्त केला.

 

Recent Posts