loader
Foto

Tiktok ban ट्रम्प म्हणतात, 'ही' कंपनी खरेदी करू शकते टिकटॉक!

चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चिनी अॅप टिकटॉकवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. टिकटॉक अॅप अमेरिकन कंपनीला विकावे अन्यथा गाशा गुंडाळावा असा इशाराच अमेरिकेने दिला आहे. आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक खरेदीसाठी कोणती कंपनी सक्षम ठरू शकते यावर भाष्य केले आहे. मागील काही दिवसापासून मायक्रोसॉफ्ट टिकटॉक खरेदी करू शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, ट्रम्प यांनी दुसऱ्याच कंपनीला आपली पसंती दर्शवली आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी म्हटले की, अमेरिकन कंपनी ओरॅकल ही एक चांगली कंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक-मालक अतिशय चांगली व्यक्ती आहे. ही कंपनी टिकटॉकला खरेदी करू शकते आणि उत्तम प्रकारे कामही करू शकते. त्यांनी पुढे म्हटले की, मायक्रोसॉफ्ट कंपनी टिकटॉक खरेदीसाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. आता ट्विटरनेदेखील टिकटॉकची मूळ कंपनी असलेल्या बाइटडान्ससोबत चर्चा केली आहे.

टिकटॉक हे शॉर्ट व्हिडिओ अॅप बाइटडान्स या कंपनीचे अॅप आहे. बाइटडान्सच्या काही गुंतवणूकदार ओरॅकल कंपनीकडे गेले आहेत. त्याशिवाय उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये शॉर्ट व्हिडिओ अॅपसाठी ओरॅकल ने पुढाकार घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे टिकटॉक खरेदीसाठी मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल मध्ये स्पर्धा असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्विटरकडूनही चाचपणी होत असली तरी ट्विटरला मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळे ट्विटर या स्पर्धेतून मागे असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, काही दिवसांआधी येत्या ९० दिवसांत बाइटडान्सने टिकटॉकची संपत्ती विकण्याचा आदेश ट्रम्प यांनी दिला. बाइटडान्समुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सबळ पुरावे असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. अमेरिकेत टिकटॉकचे १० कोटी युजर्स आहेत. अमेरिकेत टिकटॉक खरेदी करण्याबाबत बाइटडान्स आणि मायक्रोसॉफ्टमध्ये चर्चा सुरू आहे. टिकटॉक मायक्रोसॉफ्ट अथवा इतर अमेरिकन कंपनीला विक्री करण्यासाठी ट्रम्प यांनी बाइटडान्सला १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्याबाबतच्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरीदेखील केली आहे.

Recent Posts