loader
Foto

आज भारत-नेपाळ बैठक; चर्चेतून वाद सोडवणार, नेपाळ नरमला

सीमावादामुळे भारत आणि नेपाळच्या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि नेपाळमध्ये राजनयिक पातळीवर चर्चा होणार आहे. नेपाळ- भारतमधील ओवरसाईट मॅकन्झिमची ही आठवी बैठक असून दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याच्यादृष्टीने ही बैठक महत्त्वाची समजली जात आहे.

या बैठकीच्या विषयपत्रिकेवर सीमावादाचा समावेश नसला तरी मागील काही महिन्यांमध्ये दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव या बैठकीच्या माध्यमातून कमी होऊ शकतो. या बैठकीत भारताने नेपाळला विविध विकासकामांसाठी दिलेल्या निधीवर चर्चा होणार आहे. या बैठकीत नेपाळच्यावतीने शंकरदास बैरागी प्रतिनिधीत्व करणार आहेत. तर, भारताकडून नेपाळमधील राजदूत विनय मोहन क्वात्रा सहभागी होणार आहेत. ओवरसाईट मॅकन्झिमची बैठक सप्टेंबर २०१६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या भारत दौऱ्यानंतर निश्चित करण्यात आली. दोन्ही देशांत निश्चित करण्यात आलेले प्रकल्प आणि हे वेळेत प्रकल्प पूर्ण होण्याबाबत पावले उचलण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात येते.

भारतासोबतच्या चर्चेला नेपाळ उत्सुक
भारतासोबतच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर नेपाळ आता चर्चेसाठी उत्सुक आहे. यामध्ये भारतीय स्वतंत्रता दिनानिमित्त नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या होत्या. भारत आणि नेपाळ यांच्यात घनिष्ट संबंध असून चर्चेद्वारे समस्यांचे निराकरण करू शकतो असे भारतातील नेपाळच्या राजदूतांनी म्हटले. दोन्ही देश एका योग्य वेळी बैठक घेतील आणि कोणत्याही समस्येवर तोडगा काढू शकतात, असेही त्यांनी म्हटले.

लिपुलेख, कालापानी आणि लिपिंयाधुरीसह भारताच्या ३९२ चौकिमी भूभागावर नेपाळने दावा ठोकला होता. या नव्या नकाशाला नेपाळच्या संसदेने मान्यता दिली. भारतासोबत वाद सुरू झाल्यानंतर नेपाळमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे. तर, नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आमचा सीमावाद हा चीनसोबत नसून भारतासोबत असल्याचे सांगत वादात आणखी तेल ओतले होते.

दरम्यान, नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञवली यांनी चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळ या चार देशांच्या गटाबाबतचा विचार याआधीच धुडकावून लावला आहे. चीनसह झालेली बैठक ही करोना संसर्गाच्या मुद्यावर होती. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली. नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे देश 'सार्क'चे सदस्य आहेत. तर, चीन निरीक्षक आहे. त्यामुळे इतर नवीन गट बनवण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Recent Posts