loader
Foto

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने करोनावरील १०० हून अधिक औषधांचा शोध

न्यूयॉर्क: करोनाच्या आजारावर उपचार करण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञांना मोठे महत्त्वाचे यश मिळाले आहे. 'कोव्हिड-१९'वर उपचार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी शंभराहून अधिक संभाव्य औषधे शोधून काढली आहेत. 'मशिन लर्निंग'चा वापर करून ही औषधे शोधण्यात आली असून करोनावर ती प्रभावी ठरतील, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या शास्त्रज्ञांच्या या पथका एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक आनंदशंकर रे यांनी सांगितले, की आम्ही एका औषधाची निर्मिती केली. 'ड्रग डिस्कव्हरी पाइपलाइन' असा शब्दप्रयोग त्यांनी यासाठी वापरला. कम्प्युटरच्या साह्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून ही औषधे शोधण्यात आली आहेत. जर्नल हेलियोन यामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. रे म्हणाले, 'आम्ही विकसित केलेली 'ड्रग कँडिडेट पाइपलाइन' खूप महत्त्वाची असून 'कोव्हिड-१९'वर उपचार करण्यासाठी नवीन औषधे शोधण्यासाठीचे हे पहिले पाऊल आहे. विषाणूचा शरीरात प्रवेश आणि तेथे त्याची होणारी वाढ रोखण्यासाठी सध्याची औषधे काम करीत असून त्यांना सर्वाधिक प्राधान्य आहे. 'कोव्हिड'वर उपचारांसाठी आणखी औषधांची गरज असून 'डिस्कव्हरी पाइपलाइन'चा त्यासाठी उपयोग होईल.'

सिंगापूरमधील लशीची चाचणी
सिंगापूरमध्ये करोना विषाणूच्या लशीची चाचणी पहिल्या गटातील स्वयंसेवकांवर गुरुवारी करण्यात आली. २१ ते ५५ वयोगटांतील हे स्वयंसेवक आहेत. 'लुनार-कोव्ह-१९' असे या लशीचे नाव असून 'ड्यूक-एनयूएस मेडिकल स्कूल' आणि 'आर्कट्युरस थेरपीटिक्स' या अमेरिकी कंपनीने मिळून ही लस तयार केली आहे. चाचणीचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडल्याचे कंपनीने सांगितले. पुढच्या टप्प्यात ५६ ते ८० वयोगटांतील व्यक्तींवर चाचणी करण्यात येणार आहे.

तर, दुसरीकडे चीन, ब्रिटन आणि अमेरिकेच्या कंपन्यांकडूनही सुरू असलेली लस चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. जगभरात लस स्पर्धा तीव्र झाली असून आतापर्यंत पाच अब्ज लशींची नोंदणी करण्यात आली आहे.विविध कंपन्यांच्या लशीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू असताना जवळपास ५. ६ अब्जाहून अधिक लशीची नोंदणी करण्यात आली आहे. पाश्चिमात्य देशांच्या प्रयोगशाळेत विकसित होत असलेल्या लशीची पहिल्या खेपेची बहुतांश नोंदणी अमेरिकेने केली आहे. सध्या जगभरात सहा लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर, मंगळवारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी करोनाला अटकाव करणाऱ्या 'स्पुटनिक व्ही' (Sputnik V) या रशियन लशीची घोषणा केली.

Recent Posts