loader
Foto

Coronavirus रशियानंतर 'या' देशाकडे जगाचे लक्ष; तीन लशींची चाचणी अंतिम टप्प्यात

रशियाने करोनाच्या संसर्गावर मात करणारी लस शोधली असल्याची घोषणा केल्यानंतर आता लस स्पर्धा आणखी तीव्र होणार असल्याची चिन्हे आहेत. रशियाने अमेरिका, चीन, ब्रिटनला मात देत लस शोधली असल्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे आता रशियानंतर चीनकडे जगाचे लक्ष लागले आहे. चीनच्या एक नव्हे तर तीन लशी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात दाखल आहेत. त्यातील CanSino ही लस आपल्या सैनिकांना देण्यास चीनने सुरुवात केली असल्याचे वृ्त्त समोर आले आहे. चीनने विकसित केलेल्या या तिन्ही लशी चाचणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे रशियानंतर चीनकडून लस शोधली असल्याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या लशींसमोर काही आव्हाने आहेत.

चिनी कंपनी CanSino Biologicsचे सुरुवातीच्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम अतिशय चांगले आहेत. ही लस सर्दीच्या विषाणूंपासून बनवण्यात आली आहे. आता ही लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात आली आहे. सौदी अरेबियाने चाचणीसाठी ही लस पाच हजार जणांना देण्याचे नियोजन केले आहे. ही चाचणी रियाध, मक्का आणि दम्माम या ठिकाणी होणार आहे. CanSino ला मर्यादित वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

बीजिंगच्या Sinovacच्या चाचणीचे सुरुवातीचे परिणामदेखील चांगले आले होते. या लशीची मागील महिन्यात ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची सुरुवात झाली आहे. Sinovacने चाचणीसाठी ब्राझीलच्या बुटंटन इन्स्टिट्यूटसोबत करार केला आहे. या लस चाचणीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम सकारात्मक आले होते. या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा कंपनी केला आहे. या लसीच्या चाचणीसाठी १८ ते ५९ दरम्यानच्या ७४३ आरोग्य स्वयंसेवकांनी आपली नोंदणी केली होती. पहिल्या टप्प्यात १४३ जणांचा पहिल्या टप्प्यात समावेश होता. तर, दुसऱ्या टप्प्यात ६०० जणांवर चाचणी करण्यात आली. या चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना दोन इंजेक्शन देण्यात आले होते. त्यांच्यावर १४ दिवसांपर्यंत कोणतेही दुष्पपरिणाम दिसले नाहीत.

चीन सरकारची वैद्यकीय क्षेत्रातील कंपनी Sinopharm ने विकसित केलेल्या Coronavirus Vaccine ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अबुधाबीत सुरू करण्यात आली आहे. करोना विषाणूचे इनअॅक्टिवेटेड पार्टिकल्सचा वापर करून दोन लस विकसित करण्यात आली आहे. आजाराचा संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी विषाणूच्या पार्टिकल्सला इनअॅक्टिवेटेड करण्यात येते. जूनमध्ये घेण्यात आलेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लस चाचणीचे परिणाम चांगले आले असून चाचणीतील स्वयंसेवकांच्या शरीरात अॅण्टीबॉडीज तयार झाल्याचे निष्पन्न झाले होते. अबुधाबीत चाचणीच्या अंतिम टप्प्यात १५ हजार जणांना लस देण्यात आली आहे.

Recent Posts