loader
Foto

Beirut blast लेबनॉन: बैरूत बंदरातील स्फोटात परकीय शक्तींचा हात?

बैरूत: लेबनॉनची राजधानी बैरूतमधील बंदरात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या वाढली आहे. स्फोटामुळे बंदर आणि परिसरातील इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. मातीच्या ढिगाऱ्यातून अनेकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतांची संख्या १५४ वर पोहचली आहे. तर, दुसरीकडे लेबनॉनच्या राष्ट्रपतींनी या स्फोटामागे परकिय शक्तींचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर, संयुक्त राष्ट्रानेदेखील या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.

लेबनॉनचे राष्ट्रपती मायकेल आउन यांनी म्हटले की, स्फोटाच्या घटनेची चौकशी सुरू आहे. मात्र, अद्यापही याबाबतचे ठोस कारण समजू शकले नाही. या स्फोटामागे रॉकेट हल्ला, बॉम्बस्फोटासह देशाबाहेरील काही शक्तिंचा हात आहे का, याचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर, दुसरीकडे देशात सरकार तीव्र विरोधालाही सामोरे जावे लागत आहे.बैरूत स्फोटाची घटना ही अक्षम्य दुर्लक्ष आणि भ्रष्टाचारामुळे घडली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे स्थानिक जनतेत मोठा रोष निर्माण झाला आहे.

चौकशीचे आवाहन
संयुक्त राष्ट्र संघाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तालयाचे प्रवक्ते रुपर्ट कॉलविले यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला लेबनॉनच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. लेबनॉनवर सामाजिक-आर्थिक संकट, कोविड-१९ आणि अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे मोठे संकट ओढावले आहे.

बैरूत बंदरातील स्फोटामुळे जवळपास तीन लाख नागरीक बेघर झाले आहेत. स्फोटामुळे अनेकजण बेपत्ता असून बचाव कार्य करणारे कर्मचारी आणि नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू आहे. तर, या भीषण स्फोटामुळे १० ते १५ अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. स्फोटामुळे रुग्णालयाचेही नुकसान झाले आहे. मात्र, तरीदेखील जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. या स्फोटाप्रकरणी चौकशीसाठी १६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, बैरूतच्या स्फोटामध्ये पाच भारतीयही जखमी झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या पाच भारतीयांना किरकोळ दुखापत झाली आहे. लेबनॉनमधील भारतीय दूतावास सातत्याने भारतीयांच्या संपर्कात आहे. त्याशिवाय सर्वप्रकारची मदत करण्यात येत आहे. लेबनॉन सरकारच्या मदतीसाठी भारताकडून मदत पुरवण्यात येणार आहे. भारत सरकारने लेबनान सरकारकडून झालेल्या नुकसानीची माहिती मागितली आहे. त्याआधारेच भारताकडून लेबनॉनला किती मदत द्यायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Recent Posts