loader
Foto

Kim Jong Un जगाला टेन्शन! उत्तर कोरियाकडून लहान अणवस्त्रांची निर्मिती

प्योंगयांग: उत्तर कोरियाकडून होणारी क्षेपणास्त्र चाचणीमुळे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया चिंतेत असतात. आता या देशांचीच नव्हे तर सगळ्या जगाची चिंता वाढवणारे पाऊल उत्तर कोरियाने उचलले आहे. क्षेपणास्त्रद्वारे डागता येतील अशा लहान अणू बॉम्बची निर्मिती करण्यास उत्तर कोरियाला यश मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या उत्तर कोरियावरील समितीने ही बाब समोर आणली आहे. उत्तर कोरिया निर्बंधांचे उल्लंघन करत असल्याचा ठपका या समितीने लावला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या उत्तर कोरियावरील समितीने आपल्या अहवालात म्हटले की, उत्तर कोरियाकडून सातत्याने आपला अणू कार्यक्रम राबवत आहे. यामध्ये युरेनियम आणि लाइट वॉटर रिएक्टरची निर्मिती आहे. एक सदस्य देशाने सांगितले की, उत्तर कोरिया सातत्याने अणवस्त्र निर्मिती करत आहे. इतर देशांनी उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करतील अशी लहान अणूबॉम्बची निर्मिती केली असल्याचे म्हटले असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन यांनी सहा अणू बॉम्ब चाचणी ही लहान अणू बॉम्ब निर्मितीसाठी केली असल्याचा दावा काही देशांनी केला असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर, उत्तर कोरिया मल्टिपल वॉरहेड सिस्टमवर काम करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात म्हटले की, उत्तर कोरिया आपल्यावरील निर्बंधांना न जुमानता अणवस्त्र कार्यक्रम राबवत आहे. त्याशिवाय उत्तर कोरियाकडून सातत्याने सायबर हल्ले सुरू असून ऑनलाइन गुन्ह्यांमध्ये उत्तर कोरियाचा सहभाग असल्याचे अहवालात म्हटले आहे. जगभरातील अणवस्त्र कार्यक्रमांवर लक्ष ठेवणाऱ्या 'सिप्री' या आंतरराष्ट्रीय संस्थेनेदेखील उत्तर कोरियाकडे ३० ते ४० अणूबॉम्ब असून त्याची संख्या वाढवत असल्याचे म्हटले होते.

मागील आठवड्यातच उत्तर कोरियाने आपला अणवस्त्र कार्यक्रम सुरूच राहणार असल्याचे सांगितले. आमचा अणवस्त्र कार्यक्रम हा स्वसंरक्षणासाठी असल्याचे किम यांनी स्पष्ट केले होते. कोरियन युद्ध समाप्तीच्या दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात किम जोंग यांनी अणवस्त्र निर्मिती हे स्वसंरक्षणासाठी आवश्यक असल्याचे वक्तव्य केले आहे. किम जोंग यांनी उत्तर कोरियाची सत्ता सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर अणवस्त्रांच्या कार्यक्रमावर जोर दिला असल्याचे म्हटले जाते. कोरियन भूमीवर आता युद्ध होणार नसून राष्ट्रीय सुरक्षा आणि भविष्याच्या दृष्टीने आपल्यासाठी अणवस्त्र ही कायम स्वरुपी गॅरंटी असल्याचे किम यांनी म्हटले होते.

Recent Posts