loader
Foto

Coronavirus मस्तच! दुबई विमानतळावर श्वान करतात करोना चाचणी

दुबई: करोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवल्यानंतर काही देशांमध्ये विमान वाहतूक सुरू झाली आहे. विमान प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येत आहे. मात्र, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वच प्रवाशांची करोना चाचणी पार पाडली जात आहे आणि चाचणीचा निकाल अवघ्या काही मिनिटात येत आहे. या ठिकाणी खास श्वानांच्या मदतीने करोना चाचणी केली जात आहे.

करोनाबाधितांची ओळख पटवण्यासाठी श्वानांची मदत घेण्यात येणार असून त्यासाठी काही श्वानांना प्रशिक्षित करण्यात येत असल्याचे वृत्त होते. दुबई विमानतळावर या श्वानांकडून करोनाबाधित प्रवाशांचा शोध घेतला आहे. श्वानांमध्ये माणसांच्या तुलनेत स्मेल रिसेप्टर्स (वास घेण्याची क्षमता) ही १० हजार पटीने अधिक असते. त्यामुळे त्यांच्या मदतीने मलेरिया, कॅन्सर अथवा वायरल आजारबाधित व्यक्तींची ओळख पटवू शकतात.

करोना चाचणीसाठी स्वॅब घेतला जातो. काही चाचणी किट्समुळे अर्धा ते एक तासाच्या आत चाचणीचा निकाल समजतो. मात्र, श्वानांच्या मदतीने काही मिनिटांमध्ये करोनाबाधित प्रवाशी ओळखता येत असल्याचे विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. करोना चाचणीसाठी विमानतळावर एक स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. या ठिकाणी 'के९ पोलीस श्वान' पथक आहे. या चाचणी केंद्रात आलेल्या प्रवाशांची माहिती घेतल्यानंतर त्यांना एक लहान कागद दिला जातो. प्रवाशांना हा कागद आपल्या काखेत लावावा लागतो. त्यानंतर हा कागद एका बाटलीत ठेवण्यात येतो. या बाटलीवर सांकेतिक अक्षरावर माहिती भरली जाते. त्यानंतर वेगवेगळ्या काचेच्या भांड्यात हे नमुने जमा केले जातात. एका आयसोलेशन भागात हे नमुने विशिष्ट आकाराच्या भांड्यात येतात. त्या ठिकाणी पोलिसांचे प्रशिक्षित श्वान वासाच्या आधारे कोविडबाधितांची ओळख पटवतात.

या श्वानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या खास श्वानांमुळे प्रवाशांचा आणि आरोग्य सेवकांचा वेळ वाचत असल्याचे विमानतळ सुरक्षा रक्षकांनी सांगितले.
अवघ्या काही मिनिटांत या चाचणीचा परिणाम समोर येत असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत नाही. श्वानांच्या संपर्कात न येता ही करोना चाचणी होत असल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, जर्मनीत लाळेच्या वासावरून करोनाची बाधा आहे की नाही हे ओळखण्याचे प्रशिक्षण श्वानांना देण्यात येत आहे. जर्मनीतील युनिर्व्हसिटी ऑफ वेटरनरी मेडिसिन हॅनोव्हर, दि हॅनोव्हर मेडिकल स्कूल आणि जर्मन सैन्याने हे संयुक्तरीत्या संशोधन केले आहे. या संशोधनात या श्वानांना मानवी लाळेतून करोनाची बाधा आहे की नाही, हे ओळखता येणार आहे. त्यासाठी त्यांना खास प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या श्वानांनी  करोनाबाधित ओळखण्याचे प्रमाण ९४ टक्के इतके असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता विमानतळ आणि क्रीडा स्पर्धांशी निगडीत या प्रशिक्षित श्वानांचा वापर करता येऊ शकतो.

Recent Posts