loader
Foto

अमेरिकन कंपनीला विका, नाहीतर गाशा गुंडाळा; ट्रम्प यांचा टिकटॉकला इशारा

वॉशिंग्टन: चीनच्या आक्रमक विस्तारवादाचा फटका चिनी कंपन्यांना बसत आहे. भारताने चीनच्या १०६ अॅप्सवर बंदी आणल्यानंतर अमेरिकेनेही चिनी अॅप्सवर बंदी आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेतही लोकप्रिय चिनी अॅप टिकटॉकवर बंदी आणण्याचे संकेत याआधीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिले होते. आता, ट्रम्प यांनी टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सला गर्भित इशारा दिला आहे. अमेरिकन कंपनीला टिकटॉकची विक्री करा अथवा अमेरिकेतून निघून जा असे ट्रम्प यांनी बजावले आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बाइटडान्सला १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या दरम्यान बाइटडान्सला टिकटॉक अमेरिकन कंपनीला विकावे लागणार आहे. अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट टिकटॉक विकत घेण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकन नागरिकांचा डेटा टिकटॉक चीन सरकारला देत असल्याचा आरोप अमेरिकन सिनेटर्सनी केला होता. भारतातही सुरक्षितेच्या कारणास्तव टिकटॉक व इतर चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली. तर, टिकटॉकची मूळ कंपनी असलेल्या बाइटडान्सने हे आरोप फेटाळून लावले आहेत. चीन सरकारला कोणतीही माहिती शेअर केली जात नसून चीनबाहेर सर्व्हर असल्याचे याआधी बाइटडान्सने स्पष्ट केले होते.

अमेरिकेसह कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील व्यवसाय विकत घेण्याविषयी विचार करण्यात येत आहे. यासाठी अमेरिकेतील काही गुंतवणूकदारांना छोट्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठीही मायक्रोसॉफ्ट निमंत्रण देऊ शकते. या व्यवहारानंतर नव्या रचनेमध्ये, 'टिकटॉक'च्या सध्याच्या यूझरच्या अनुभवाबरोबरच जागतिक दर्जाची सुरक्षा, गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षा यंत्रणांचाही विचार करण्यात येणार आहे. अमेरिकन यूझरची माहिती पूर्ण हस्तांतरीत करत, ती अमेरिकेमध्ये सुरक्षित राहील; तसेच ही माहिती अमेरिकेमध्ये साठविण्यात येईल आणि ही माहिती अन्य देशांकडे हस्तांतरित झाल्यानंतर डिलीट होईल, याचीही काळजी घेण्यात येणार आहे, असे 'मायक्रोसॉफ्ट'ने म्हटले आहे.

दरम्यान, टिकटॉक अमेरिकेतील बंदीपासून वाचण्यासाठी धडपड करत असल्याचे वृत्त समोर आले होते. अमेरिकेतील बाजारपेठ कायम रहावी यासाठी काही शेअर्स विकण्याची तयारी टिकटॉकची मुख्य कंपनी बाइटडान्सने दर्शवली आहे. त्यादृष्टीने त्यांची चाचपणीही सुरू असल्याची माहिती समोर आली होती. आता, टिकटॉकचे अमेरिकेतील ऑपरेशन्स मायक्रोसॉफ्ट कंपनी खरेदी करू शकते, अशी दाट शक्यता याआधीच वर्तवण्यात आली होती. मायक्रोसॉफ्ट आणि बाइटडान्समध्ये टिकटॉकबाबत चर्चा सुरू असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या कराराच्या विरोधात असल्याचे वृत्त होते. मात्र, आता, ट्रम्प यांनी टिकटॉक विक्रीसाठी मुदत दिल्यामुळे ट्रम्प यांचा या कराराला पाठिंबा असल्याचे वृत्त आहे.

भारताने टिकटॉकसह १०६ अॅपवर बंदी आ. यामध्ये बाइट डान्स कंपनीशी निगडीत टिकटॉक आणि हॅलो या दोन मुख्य अॅपचा समावेश होता. हे दोन्ही अॅप भारतात लोकप्रिय आहेत. भारताने बंदी घातल्यामुळे बाइट डान्सला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच इतर देशांतील बंदीपासून वाचण्यासाठी बाइट डान्सने धडपड सुरू केली आहे.

Recent Posts