loader
Foto

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला, ९ ठार अनेक जखमी

काबूल: अफगाणिस्तानच्या नागरी वस्त्या असलेल्या भागात पाकिस्तानने रॉकेट हल्ला केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या हल्ल्यात ९ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जखमी झाले असल्याची माहिती अफगाणिस्तानमधील माध्यमांनी दिली आहे. पाकिस्तानी हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननेही प्रत्युत्तरासाठी सैन्य सज्ज ठेवले आहे.

अफगाणिस्तानमधील TOLOnewsच्या वृत्तानुसार अफगाण संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे.अफगाण सैन्यांना पाकिस्तानी सैन्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी निवासी भागात रॉकेट हल्ल्यात नऊ नागरिक ठार तर ५० जण जखमी झाले. अफगाणिस्तान लष्करप्रमुख जनरल मोहम्मद यासीन जिया लेवी यांनी पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी सर्व सैन्य दलाला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

लष्करप्रमुख मोहम्मद यासीन झिया यांच्या नेतृत्वात हवाई दल आणि विशेष सैन्य दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या भूप्रदेशावर रॉकेट हल्ला सुरूच ठेवला तर अफगाण सैन्यदलाकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात येणार असल्याचेही अफगाणिस्तान सरकारने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात महिला आणि लहान मुलेही ठार झाले असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या हल्ल्याआधी अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी संध्याकाळी एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात आठजण ठार झाले असून ३० हून अधिकजण जखमी झाले. हा बॉम्बस्फोट लोगार प्रातांत झाला. या हल्ल्यामागे तालिबानचा हात असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्यापही याची कोणी जबाबदारी घेतली नाही. या हल्ल्यातही लहान मुले जखमी झाले. स्फोट झालेली कार सुरक्षा तपासणीसाठी थांबली होती. त्यावेळी हा स्फोट झाला. मृतांमध्ये कारमधील लोकांचाही समावेश आहे.

दरम्यान, मुस्लिम धर्मीयांसाठी महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या ईद-अल-अजहामुळे तालिबानने २८ जुलै रोजी तीन दिवस शस्त्रसंधी जाहीर केली होती.

Recent Posts