loader
Foto

मृत्यूचे थैमान सुरूच; अमेरिकेत दीड लाख करोनाबाधितांचा मृत्यू

वॉशिंग्टन: जगभरातील २०० देशांमध्ये करोना संसर्गाचे थैमान सुरू आहे. करोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत झाला असून करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाच्या आजारामुळे प्राण गमावलेल्या नागरिकांची संख्या एक लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे.

वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेत ४५ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी एक लाख ५३ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. तर, २२ लाखांहून अधिकजणांनी करोनावर मात केली आहे. मागील २४ तासात अमेरिकेत करोनामुळे ११५६ जणांचा मृत्यू झाला असून ५० हजारांहून अधिक नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

अमेरिकेनंतर सर्वाधिक करोनाबाधित ब्राझीलमध्ये आढळले आहेत. ब्राझीलमध्ये २५ लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ९० हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात ब्राझीलमध्ये करोनाच्या संसर्गामुळे १५०० जणांचा मृ्त्यू झाला आहे. सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात १५ लाख ८४ हजार करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ३५ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. तर, १० लाख रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

दरम्यान, जगभरात करोनाच्या संसर्गाने थैमान घातले असल्यामुळे अनेकांच्या मनात करोनाची भीती निर्माण झाली आहे. त्यातच एकदा करोनाची बाधा झाल्यानंतर पुन्हा करोनाची बाधा होण्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र, नव्या अभ्यासानुसार, करोनाची दुसऱ्यांदा बाधा होण्याची शक्यता कमीच असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

करोनाबाधा दोन वेळा होऊ शकते का, या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ खात्रीपूर्वक देऊ शकत नसले तरी अशी शक्यता जवळपास नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील काही विद्यापीठात याबाबत संशोधन झाले आहे. एकदा करोनाची बाधा झाल्यावर त्या संसर्गासाठी काही प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होत असली, तरी ती किती काळ टिकेल, याबाबत साशंकता आहे. करोनामुक्त झालेले रुग्ण काही आठवड्यांनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आल्याच्या काही घटना नोंदवण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या संसर्गाचे काही अवशेष या चाचण्यामध्ये आढळत असतील. त्यामुळेच त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत असावी. त्याशिवाय अनेकदा करोनाची बाधा झाली असल्याचे सांगणारी चाचणी चुकीचे असल्याचे आढळले आहे. या अशा प्रकरणांमध्येही चाचणी चुकीच्या प्रकारे आढळत असेल असे म्हटले जाते.

Recent Posts