loader
Foto

Coronavirus चिंता वाढली! करोनाबाधितांची संख्या सहा आठवड्यात दुप्पट

जिनिव्हा: जगभरात करोनाचा संसर्ग वाढत असून करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मागील सहा आठवड्यातच करोनाबाधितांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अॅधनोम गेब्रेयसस यांनी म्हटले आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या दीड कोटींहून अधिक झाली आहे.

करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आता जागतिक आरोग्य आरोग्य संघटनेने आपात्कालिन बैठक बोलावली आहे. जागतिक आरोग्य संघटनेची ही बैठक गुरुवारी पार पडणार आहे. करोनाला आळा घालण्यासाठी या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अॅधनोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, करोनाच्या महासंकटामुळे संपूर्ण जग बदलले आहे. या महासंकटाच्या काळात व्यक्ती, समाज आणि देश एकत्र आले आहेत. काही देशांमध्ये राजकीय नेतृत्व, शिक्षण,करोना चाचणी दर, स्वच्छता आणि सोशल डिस्टेंसिंगसारख्या अनेक उपाययोजनांवर अंमलबजावणी झाली आहे. या सर्वांतून करोनाला बऱ्यापैकी नियंत्रणात आणणे काही देशांना शक्य झाले आहे.

करोनाच्या संसर्गाचा जोर अद्यापही ओसरला नसून येणाऱ्या दिवसांत हा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा याआधीच जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. काही देशांच्या राजकीय नेतृत्वाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने याआधी म्हटले होते.

जगभरात एक कोटी ६० लाखजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, सहा लाख ४४ हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत करोनाने थैमान घातले असून ४१ लाख जणांना बाधा झाली आहे. तर, जवळपास एक लाख ४६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये २३ लाख ९४ हजार ५१३ जणांना करोनाची बाधा झाली असून ८६ हजारजणांचा मृत्यू झाला आहे.भारतातही करोनाबाधितांची संख्या १४ लाखांहून अधिक झाली आहे. तर, ३२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील ९ लाख १७ हजार रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.

दरम्यान, करोनाच्या संसर्गाने अमेरिकेसह जगभरात थैमान घातले आहे. करोनाला अटकाव करणाऱ्या लशी विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केले आहे. येत्या दोन आठवड्यात लशीबाबत , उपचाराबाबत चांगली बातमी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्हाइट हाउस येथे सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. येत्या दोन आठवड्यात आमच्याकडे लशीबाबत खात्रीशीर चांगली माहिती उपलब्ध असणार असल्याचे सांगितले. ट्रम्प यांच्या या विधानामुळे लशीबाबतचे खात्रीशीर निष्कर्ष समोर येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Recent Posts