loader
Foto

Coronavirus मस्तच! 'या' देशात करोनाची चाचणी मोफत; भरलेले शुल्क रिफंड मिळणार

पॅरिस: करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाच्या बदलत्या स्वरुपामुळे काहीवेळेस करोनाबाधित रुग्णांना ओळखणे कठीण जात आहे. त्यामुळे करोना चाचणी करण्यावर अनेक देशांनी भर दिला आहे. करोनाचा फटका जगभरातील अनेक विकसित देशांनाही बसला आहे. मात्र, त्यातही आता फ्रान्सने आपल्या नागरिकांसाठी करोनाची चाचणी मोफत केली आहे. त्याशिवाय खासगी रुग्णालयाकडून ज्यांनी चाचणी केली असेल, अथवा ज्यांनी यापूर्वीही चाचणी केली असेल, त्या सर्व नागरिकांना रिफंड देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री ऑलिव्हियर वेरन यांनी केली.

व्हर्नन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मी या शनिवारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. कोणताही फ्रान्सचा नागरीक पूर्णपणे पीसीआर करोना चाचणी पुन्हा करू शकतो." त्यासाठी डॉक्टरांच्या सूचनेची किंवा कारणाची आवश्यकता भासणार नाही. करोनाची लक्षणे दिसत नसलेल्या नागरिकांनाही ही मोफत चाचणी करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्समध्ये करोनाची दुसरी लाट येण्याबाबत त्यांनी अतिशय सावध उत्तर दिले. करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत आता बोलणे फार घाईचे होईल. मागील काही दिवसात करोनाबाधित प्रकरणे कमी आढळत आहेत. युवकांनी करोनाच्या संसर्गाला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

फ्रान्समध्ये आतापर्यंत २ लाख १७ हजार ८०१ जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, जगभरात एक कोटी ६० लाखजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, सहा लाख ४४ हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत करोनाने थैमान घातले असून ४१ लाख जणांना बाधा झाली आहे. तर, जवळपास एक लाख ४६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये २३ लाख ९४ हजार ५१३ जणांना करोनाची बाधा झाली असून ८६ हजारजणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाखांवर गेली आहे. कोरोना व्हायरसने देशात आतापर्यंत १४,११,९५४ जणांना संसर्ग झाला आहे, अशी रविवारची ही आकडेवारी आहे. covid19india.org ने ही आकडेवारी दिली. या आकडेवारीनुसार कोरोनाचे देशात ४ लाख ७७ हजार २२८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर ९, ०१,९५९ जण करोनामु्क्त झाले आहेत. बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनामुळे देशात आतापर्यंत ३२ हजार ३५० नागरिकांचा बळी गेला आहे.

Recent Posts