loader
Foto

हनी ट्रॅप: तरुणीनं हॉटेलात बोलावलं, डॉक्टरसोबत बनवला अश्लिल व्हिडिओ

 

फरीदाबाद: फरीदाबादमधील सेक्टर १० मध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. क्राइम ब्रँचची पोलीस असल्याची बतावणी करून डॉक्टरला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर त्याला हॉटेलात बोलावलं. त्यानंतर त्याच्यासोबत अश्लिल फोटो आणि व्हिडिओ बनवला. त्यानंतर डॉक्टरला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका डॉक्टरला तरुणी आणि तिच्या साथीदारांनी हनी ट्रॅपमध्ये अडकवलं. त्यानंतर त्याला एका हॉटेलात बोलावलं. तेथे आधीच तिचे दोन साथीदार होते. त्यांनी डॉक्टरसोबतचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर तरुणीसह या टोळीनं त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हे प्रकरण जास्त ताणू नका, असं डॉक्टरनं त्यांना सांगितलं. मात्र, टोळीनं त्याच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली. याबाबत महिला पोलीस ठाण्याच्या एसीपी धारणा यादव यांनी सांगितलं की, या टोळीचा भंडाफोड करण्याची कामगिरी पोलीस आयुक्तांनी क्राइम ब्रँचकडे सोपवली होती. सेक्टर ८५ क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी सूत्रांच्या मदतीने या टोळीची माहिती घेतली. या टोळीत ३ सदस्य आहेत. त्यातील दोघे जण हे स्वतःला हरयाणा पोलिसांत असल्याची बतावणी करतात अशी माहिती मिळाली. त्यांच्यासोबत एक २५ वर्षीय महिला असून, ती दिल्लीची रहिवासी असल्याचं कळलं.

पेशंट बनून डॉक्टरला भेटत होती...
एक महिला पेशंट बनून आली होती. त्यानंतर ती दररोजच यायला लागली. काही दिवसांनी महिलेनं डॉक्टरशी मैत्री केली. त्यानंतर एक दिवस तिनं सांगितलं की, हॉटेलमध्ये भेटायचं आहे. आरोपी महिला डॉक्टरला हॉटेलात घेऊन गेली. तिथं आधीच तोतया पोलीस होते. त्यांनी तरुणी आणि डॉक्टरचे आक्षेपार्ह अवस्थेत फोटो आणि व्हिडिओ काढले. दोन दिवसांनी सेक्टर ३०मध्ये तोतया पोलीस प्रवीण आणि ब्रह्म याने डॉक्टरला फोन केला. महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार आमच्याकडे आल्याचे त्यांनी सांगितलं. गुन्हा दाखल करण्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर डॉक्टरने महिलेशी संपर्क साधला. राहुल नावाचा तरुण तिचा भाऊ बनून तिला भेटण्यासाठी घेऊन आला. त्यांनी डॉक्टरला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसंच डॉक्टरला धमकावले. त्याच्याकडे २० लाखांची मागणी केली.

पोलिसांनी सांगितलं की, डॉक्टरने त्यांना फक्त २० हजार रुपये दिले. उरलेले पैसे नंतर देणार असल्याचं त्यानं ब्लॅकमेल करणाऱ्यांना सांगितलं. डॉक्टरनं २० हजार रुपये त्यांच्या हातात देताच, सीआयए पथकाने आरोपींना रंगेहाथ पकडलं. तोतया पोलीस बनून लुटणाऱ्या प्रवीण आणि ब्रह्मला पोलिसांनी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना कोठडी सुनावली आहे. अटक केलेला आरोपी प्रवीण याला १९९२ मध्ये हरयाणा पोलिसांनी बडतर्फ केले होते. मात्र, त्याला कोणत्या कारणानं बडतर्फ केलं होतं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

Recent Posts