loader
Foto

Jacinda Ardern महिला कर्मचाऱ्यासोबत अनैतिक संबंध; मंत्र्याची हकालपट्टी

वेलिंग्टन: मंत्रिपदावर असताना काही मंत्र्यांवर अनैतिक कामे, भ्रष्टाचार करत असल्याचे आरोप होतात. मात्र, त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय फार कमी वेळा घेतला जातो. त्याहीपेक्षा त्यांना क्लिन चीट कशी मिळेल यावर सत्ताधाऱ्यांचा कटाक्ष असल्याचा आरोपही होतो. मात्र, न्यूझीलंडमध्ये एक वेगळंच प्रकरण समोर आले आहे. आपल्या खात्यातील एका महिला कर्मचाऱ्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणावरून एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी ही माहिती दिली. अर्डर्न यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री इयान लीस-गॅलोवे यांचे एका महिलेसोबत जवळपास एक वर्षापासून संबंध होते.

ही महिला मंत्री लीस-गॅलोवे यांच्या अखत्यारीत असलेल्या एका विभागात कार्यरत होती. त्यानंतर तिची नेमणूक मंत्र्यांच्या कार्यालयात करण्यात आली होती. हकालपट्टी झालेले मंत्री लीस-गॅलोवे यांनी सांगितले की, पंतप्रधान अर्डर्न यांनी घेतलेला निर्णय मान्य आहे. मी केलेल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपण उमेदवारी दाखल करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री म्हणून काम करत असताना आपण चुकीच्या पद्धतीने काम केले असून पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही त्यांनी म्हटले. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी म्हटले की मंगळवारी लीस-गॅलोवे यांच्यावरील आरोपांची माहिती समजल्यानंतर त्यांच्याशी सायंकाळी या मुद्यावर चर्चा करून लीस-गॅलोवे यांना प्रश्न विचारले. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. हकालपट्टी झालेले मंत्री लीस-गॅलोवे हे विवाहीत आहेत.

दरम्यान, एक दिवसआधी विरोधी पक्षाचे खासदार अॅण्ड्रयू फॅलोन यांच्यावर अनेक महिलांना अश्लील छायाचित्रे पाठवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. फॅलोन यांनी आरोपांवर कोणतीही टिप्पणी केली नाही. मात्र, आपल्यावरील कथित आरोपांबाबत माफी मागत असल्याचे सांगितले.

Recent Posts