loader
Foto

चिनी महावाणिज्य दूतावास बंद करण्याचे अमेरिकेचे आदेश

वॉशिंग्टन: अमेरिका आणि चीनमधील वाद शिगेला पोहचत असून अमेरिकेने ह्युस्टन येथील चीनच्या महावाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ह्युस्टन येथील दूतावास ७२ तासांमध्ये बंद करण्याचे आदेश अमेरिकेने दिले आहेत. अमेरिकेच्या या कारवाईनंतर चीननेही प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे.

अमेरिका आणि चीनमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. व्यापार करार आणि त्यानंतर झालेल्या करोनाच्या संसर्गामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता अमेरिकेने ह्युस्टन येथील महावाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी अमेरिकेने चीनला ७२ तासांची मुदत दिली आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे चीन संतप्त झाला असून परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेनेही कारवाई मागे न घेतल्यास चीन प्रत्युत्तरादाखल आवश्यक ती कारवाई करेल, अशा इशाराही चीनने दिला आहे.

दरम्यान, अमेरिकेने दूतावास बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर चीनच्या दूतावासात गोंधळ उडाला. महावाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जाळली असल्याचे समोर आले आहे. दूतावास कार्यालयात दिसत असलेल्या आगीमुळे ह्युस्टन अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले. मात्र, त्यांना दूतावास कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला.

दरम्यान, करोना साथीला जबाबदार असल्याबद्दल चीनविरोधात अमेरिकी नागरिकांना खटला दाखल करण्याची परवानगी देण्याची तरतूद असलेले विधेयक रिपब्लिकन पक्षाच्या काही सिनेटरनी सादर केले आहे. अमेरिकी नागरिकांना फेडरल कोर्टात चीनविरोधात खटला दाखल करण्याची परवानगी देण्याची तरतूद या विधेयकात आहे. सिनेटर मार्था मॅकसॅली, मार्शा ब्लॅकबर्न, टॉम कॉटन, जॉश हॅवले, माइक राउंड्स आणि थॉम टिलिस यांनी हे विधेयक सादर केले आहे. करोना साथीस जबाबदार असल्याबद्दल चीनविरोधात खटला भरण्याची तरतूद यात आहे. याशिवाय, फेडरल कोर्टांना चिनी मालमत्ता जप्त करण्याचे अधिकारही या विधेयकात देण्यात आले आहेत.

'कोव्हिड-१९ आजाराबद्दल चीन पारदर्शक नाही; तसेच चीनला जगात करोना विषाणूचा प्रसार रोखता आला असता. मात्र, त्यांनी प्रसार न रोखण्याचा पर्याय निवडला,' असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. करोना साथीच्या नियंत्रणावरून ट्रम्प यांनी यापूर्वीही चीनवर टीका केली आहे. करोनामुळे जगभरात सहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी अमेरिकेत १ लाख ४३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

Recent Posts