loader
Foto

Coronavirus करोनाच्या आजारावर 'हे' औषध ठरतेय संजीवनी!

लंडन: करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले असताना करोनाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. करोना प्रतिबंधक लशींवर संशोधन सुरू असताना डॉक्टरांकडून विविध औषधांचा वापर बाधितांवर उपचारासाठी करण्यात येत आहे. ब्रिटनमधील औषध कंपनी Synairgen एक मोठा दावा केला असून इंटरफेरान बीटा प्रोटीनवर आधारीत असलेले औषध SNG001 या औषधामुळे करोनाबाधितांना मोठा दिलासा मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या औषधाच्या वापरामुळे रुग्णांना आयसीयूची आवश्यकता कमी लागत असल्याचेही म्हटले आहे.

करोनाबाधितांच्या उपचारासाठी वापरण्यात आलेले SNG001 या औषधामध्ये नैसर्गिकरीत्या अॅण्टीव्हायरल प्रोटीन असून हे औषध फुफ्फुसापर्यंत जाते. ज्या रुग्णांना SNG001 हे औषध दिले. त्यांच्यामध्ये गंभीर आजारी होण्याचा धोका ७९ टक्के प्रमाणावर कमी झाला. इतकंच नव्हे तर ज्यांना हे औषध दिले, ते रुग्ण इतर करोनाबाधितांच्या तुलनेने लवकर बरे झाले असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या औषधामुळे करोनाबाधितांना श्वास घेण्यासही कमी त्रास होत असल्याचे समोर आले आहे. ३० मार्च ते २७ मे दरम्यान १०७ रुग्णांचा अभ्यास करण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली. Synairgen कंपनीनेच सीईओ रिचर्ड मर्सडेन यांनी सांगितले की, SNG001 हे औषध रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांच्या उपचारांसाठी महत्त्वाचे ठरू शकते. सरकार आणि अन्य महत्त्वाच्या संस्थांसोबत एकत्र काम करण्याचा आमचा प्रयत्न असून लवकरात लवकर करोनावर औषध निर्मिती करता येऊ शकते.

दरम्यान, जगभरातील २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. करोनावर नियंत्रण ठेवण्यास काही मोजक्याच देशांना यश आले आहे. अमेरिका, ब्राझील आणि भारतामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. अमेरिका आणि भारतातील एकत्रित करोनाबाधितांची संख्या एक लाखाच्या आसपास जाते. तर, ब्राझीलमध्ये ही दररोज सरासरी ३० हजार करोनाबाधित आढळत आहेत. अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधित असून ३९ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, एक लाख ३८ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये २१ लाख आणि भारतात ११ लाख करोनाबाधित आहेत. ब्राझीलमध्ये करोनाच्या संसर्गामुळे ७० हजारांहून नागरिकांचा मृत्यू झाला असून भारतात जवळपास २६ हजारांहून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहे.

Recent Posts