loader
Foto

Chinese Apps Ban पाकिस्तानने चीनला दिला झटका! 'या' अॅपवर घातली बंदी

इस्लामाबाद: पाकिस्तानने आपला जिवलग मित्र असलेल्या चीनला झटका दिला आहे. पाकिस्तान सरकारने चिनी कंपनीच्या बिगो अॅपवर बंदी घातली असून टिकटॉकला इशारा दिला आहे. पाकिस्तानने याआधी पब्जी गेमवर बंदी घातली होती. भारताने सुरक्षितेच्या कारणास्तव चीनच्या ५९ अॅपवर बंदी घातली. त्यानंतर अमेरिकेतही चिनी अॅपवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे.

पाकिस्तानमध्ये या अॅपमुळे समाजात अश्लीलता वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मागील आठवड्यात टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी लाहोर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्याच्या काळात हे अॅप अतिशय घातक असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. टिकटॉक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि रेटिंगच्या लालसेतून हे अॅप सध्या पोर्नोग्राफीचे स्रोत झाले असल्याचाही आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. टिकटॉक आणि बिगो अॅपविरोधात अनेकांनी पाकिस्तान सरकारकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.

पाकिस्तान सरकारने म्हटले की, दोन्ही अॅप कंपन्यांना याबाबत विचारणा झाली होती. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नाही. त्यानंतर बिगो अॅपवर बंदी घातली असून टिकटॉकला इशारा देण्यात आला आहे. याआधी पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारने ऑनलाइन गेम पब्जीवर बंदी घातली होती. हा गेम इस्लामविरोधी असून या गेमचे युवकांना व्यसन लागत असल्याचा दावा करत पब्जीवर बंदी घालण्यात आली.

पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन ऑथिरीटीनुसार, पाकिस्तानमध्ये पब्जीच्या कारणास्तव अनेक युवकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. त्यातूनच युवकांमधील आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले. पब्जी गेममधील काही दृष्ये ही इस्लामविरोधी असल्याचे सरकारने कोर्टात सांगितले होते. त्यामुळे या गेमला पाकिस्तानमध्ये परवानगी देता येणार नसल्याचे सरकारने म्हटले.

दरम्यान, लडाखमधील भारत-चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव वाढल्यानंतर भारताने चिनी कंपन्यांची निर्मिती असलेल्या ५९ अॅप्सवर बंदी घातली. बंदी घातलेल्या अॅप्सविरोधात अनेक तक्रारी येत होत्या. हे अॅप्स देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेसाठी घातक बनत चालले होते. चीन या अॅप्सद्वारे भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करू शकत होता, त्यामुळे केंद्र सरकारने या अॅप्सवर बंदी घातली. या बंदीनंतर चीनला आंतरराष्ट्रीय कायदा आठवला होता. चीन सरकारने कायमच आपल्या देशातील कंपन्यांना अन्य देशांमधील कायद्यांचे पूर्णपणे पालन करण्याची सूचना, निर्देश दिलेले आहेत. भारतानेदेखील परदेशी गुंतवणुकदारांच्या कायदेशीर अधिकारांचा सन्मान करायला हवा. यामध्ये चिनी गुंतवणूकदार असून भेदभाव करता कामा नये असेही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.

Recent Posts