loader
Foto

करोना: आनंदाची बातमी! 'या' लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

अबुधाबी: करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांकडून प्रयत्न सुरू आहेत. काही लशींच्या या निर्णायक टप्प्यावर आहे. आता आणखी एका लशीची तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी सुरू झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी सुरू करणारी ही पहिलीच कंपनी आहे.

चीनच्या सायनोफार्म कंपनीने ही लस विकसित केली आहे. या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत १५ हजार नागरिकांना लस टोचण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी ही चाचणी करण्यात येणार आहे. या क्लिनिकल चाचणीची सुरुवात युएईचे शेख अब्दुला बिन मोहम्मद अल हमद यांनी केली. जागतिक आरोग्य संघटनेकडे या लसीची नोंदणी करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये जवळपास २०० देशांच्या नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळेच या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत १८ ते ६० वर्षापर्यंतच्या वयोगटातील स्वयंसेवकांचा समावेश आहे.

या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अत्यंत कठोर नियमांमध्ये करण्यात येत आहे. या लशीची पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात येत आहे. सायनोफार्म कंपनीचे अध्यक्ष यांग शिआओमिंग यांनी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी होईल असे म्हटले आहे. याआधीच्या चाचणी दरम्यान ही लस २८ दिवसांमध्ये दोन वेळेस दिल्यानंतर १०० टक्के स्वयंसेवकांमध्ये अॅण्टीबॉडी विकसित झाली असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

दरम्यान, अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. तर, ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्याची तयारी झाली आहे. याबाबत २० जुलै रोजी महत्त्वाची माहिती प्रकाशित होण्याची दाट शक्यता आहे. करोनाच्या संसर्गावर लस विकसित केली असल्याचा दावा रशियाने केला असला तरी त्याबाबत इतर देशातील संशोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही देशाने अथवा कंपनीने लस चाचणी पूर्ण केली नाही. जवळपास २३ कंपन्यांच्या लशीची चाचणी सुरू आहे. यापैकी तीन लशी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीपर्यंत पोहचले आहेत.

Recent Posts