loader
Foto

Coronavirus 'ऑक्सफर्ड'च्या लसचाचणीने वाढवल्या आशा; 'या' दिवशी माहिती जाहीर होणार

लंडन: सध्या सर्वत्र करोनाने थैमान घातले असताना या महासंकटाला आळा घालणारी लस कधी निर्माण होते, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. अशातच कोविड-१९च्या लसचाचणीत उल्लेखनीय यश मिळाल्याचा दावा ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. प्राथमिक टप्प्यात दुहेरी संरक्षण देणाऱ्या लशीची मानवी चाचणी यशस्वी झाल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे.

इंग्लंडमधील नागरिकांच्या एका गटावर ही चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले असता, त्यांच्या शरीरात अॅण्टीबॉडीज आणि विषाणूंना मारणाऱ्या पेशीची (टी-सेल) निर्मिती झालेली आढळून आल्याचे एका वरिष्ठ संशोधकाने 'द टेलिग्राफ' या वृत्तपत्राला सांगितले. अॅण्टीबॉडीज महिनाभरात निघून जात असल्या, तरी टी-सेल अनेक वर्षे रक्ताभिसरणात राहू शकतात, असे वेगवेगळ्या अभ्यासांतून स्पष्ट झाले असल्याने हे संशोधन महत्त्वाचे मानले जात आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे हे संशोधन आशादायी असे असले, तरी ही लस जीवघेण्या कोविड-१९ विषाणूचा सामना करण्यासाठी दीर्घवेळ रोगप्रतिकार शक्ती पुरवू शकते का, हे स्पष्ट झाले नसल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

'ऑक्सफर्डची लस दोन पातळ्यांवर यशस्वी झाली आहे. याद्वारे अॅण्टीबॉडीज आणि टी-सेलची निर्मिती करण्यात यश आले आहे. या दोहोंच्या माध्यमातून आपण नागरिकांना सुरक्षित ठेवू शकू, अशी आशा आहे. आत्तापर्यंतचे हे सर्वोत्तम यश आहे. परंतु, अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे', असे यातील एका संशोधकाने सांगितले.

ऑक्सफर्डचे संशोधक योग्य मार्गावर असल्याचे या संशोधनाला मंजुरी देणारे 'बर्कशायर रिसर्च एथिक्स कमिटी'चे अध्यक्ष डेव्हिड कारपेंटर यांनी म्हटले आहे. 'लान्सेट मेडिकल जर्नल'ने लसचाचणीच्या या पहिल्या टप्प्यातील संशोधन प्रसिद्ध करणार असल्याचे नमूद केले आहे. या पहिल्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष व संबंधित माहिती पुढील आठवड्यात, २० जुलै रोजी प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती 'लान्सेट मेडिकल जर्नल'च्या प्रवक्त्यांनी राउटर्स या वृत्त संस्थेला दिली आहे. त्यामध्ये लसीच्या प्रभावीपणाबाबत अधिक माहिती समोर येईल.

दरम्यान, अमेरिकेतील अमेरिकेतील मॉडर्ना इंक (Moderna Inc)कंपनीने विकसित केलेली लस आता अंतिम टप्प्याची चाचणी सुरू करणार आहे. मॉडर्ना इंक (Moderna Inc)कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची सुरुवात २७ जुलैपासून सुरू होणार आहे. अमेरिकेतील ८७ ठिकाणी या लशीची चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास ३० हजारजणांना ही लस टोचण्यात येणार आहे.

Recent Posts