loader
Foto

साक्षात जाळ! जवळून सूर्य असा दिसतो... एकदा पाहाच!

वॉशिंग्टन: आपल्या सूर्यमालेतील केंद्र स्थानी असणारा आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीत आणि मानवी संस्कृती महत्त्वाची भूमिका असणाऱ्या सूर्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहे. सूर्याबद्दल अंतराळ शास्त्रज्ञांचा अभ्यास सुरू आहे. युरोपीयन अंतराळ संस्था आणि नासाने आतापर्यंतचे सूर्याच्या जवळून घेतलेले छायाचित्र जाहीर केले आहेत. सूर्यावरील प्रत्येक भाग एखाद्या असंख्य 'कॅम्पफायर' प्रमाणे दिसत आहे.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी युरोपीयन अंतराळ संस्था आणि अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने फेब्रुवारी एक सोलर ऑर्बिटर प्रक्षेपित केले होते. सोलर ऑर्बिटरने घेतलेले छायाचित्र गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. ही छायाचित्रे मागील महिन्यात काढण्यात आली होती. त्यावेळी सोलर ऑर्बिटर हा सूर्यापासून जवळपास ४८ दशलक्ष मैल दूर होता. हे अंतर पृ्थ्वी आणि सूर्या दरम्यान असणाऱ्या अंतराचे निम्मे अंतर आहे.

सूर्यावर दिसणाऱ्या आगीच्या ज्वाळांना शास्त्रज्ञांनी 'कॅम्पफायर' असे संबोधले आहे. सूर्याच्या इतक्या जवळून घेतलेल्या छायाचित्रांचे संशोधनाच्यादृष्टीने मोठे महत्त्व आहे. सोलर ऑर्बिटरच्या माध्यमातून घेण्यात येणारे छायाचित्र इतके चांगले असतील यावर आमचा विश्वास नसल्याचे संशोधकांनी म्हटले. सूर्याचे छायाचित्र काढणाऱ्या उपकरणाची निर्मिती करणारे प्रमुख वैज्ञानिक डेविड बर्गमान्स यांनी हे छायाचित्र पाहिल्यानंतर आश्चर्यचकीत झालो असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या अपेक्षेहून अधिक चांगले परिणाम समोर आले आहेत. सूर्यावर दिसणारे 'कॅम्प फायर' हे लहान स्फोट अथवा नॅनोफ्लेर असू शकतात. त्याबाबत अधिक माहिती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेतून सूर्याबद्दल अधिक चांगली व महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. सोलर ऑर्बिटर पुढील दोन वर्षात सूर्याच्या आणखी जवळ जाणार आहे. करोनाच्या संसर्गामुळे या मोहिमेवर काम करणाऱ्या संशोधकांना 'वर्क फ्रॉम होम' करावे लागत आहे. जर्मनीतील डार्मस्टाडमधील नियंत्रण कक्षात फक्त काही वेळेसाठी मोजक्याच अभियंत्यांना प्रवेश दिला जातो.

Recent Posts