loader
Foto

भारतीय रुग्णाचं १ कोटींचं बिल केलं माफ; वरून ₹ १० हजार दिले

दुबई: करोनाच्या आजारामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. त्यातच खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर येणाऱ्या अव्वाच्या सव्वा खर्चाची अनेकांना धास्ती असते. दुबईत एका भारतीयाला करोनाची बाधा झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल केले. मात्र, रुग्णालयाने तब्बल एक कोटींचे बिल त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवले. पुढे जे झाले त्याचा विचार सध्याच्या परिस्थितीत कोणीच करू शकत नाही. या रुग्णालयाने या भारतीय रुग्णाचे सर्व बिल माफ केले.

तेलंगणामधील जगतियाल जिल्ह्यातील ४२ वर्षीय ओडनाला राजेश यांना २३ एप्रिल रोजी प्रकृती बिघडली. करोना चाचणी केल्यानंतर त्यांना करोना झाला असल्याचे समोर आले. त्यानंतर राजेश यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास ८० दिवस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या ८० दिवसांच्या उपचाराचे बिल समोर आले तेव्हा राजेश हादरून गेले. या ८० दिवसांचे बिल ७ लाख ६२ हजार ५५५ दिरम (स्थानिक चलन) म्हणजेच जवळपास एक कोटी ५२ लाख रुपये आले होते.

राजेश यांना गल्फ वर्कर प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष गुंडेल्ली नरसिंहा यांनी रुग्णालयात दाखल केले होते. राजेश यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात त्याची भेट घेत होते. या वाढीव बिलाबाबत त्यांनी भारतीय दूतावासातील स्वयंसेवक सुमनाथ रेड्डी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भारतीय कामगारांबाबतचे भारतीय राजदूत हरजित सिंग यांना याची कल्पना देण्यात आली. राजेशची एवढी ऐपत नसल्यामुळे त्याची मदत करण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर हरजित सिंग यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला पत्र लिहून मानवतेच्या दृष्टीने निर्णय घेत बिल माफ करण्यास सांगितले.

रुग्णालय प्रशासनाने मानवतेच्या दृष्टीने विचार करून राजेश यांच्या उपचाराचा खर्च माफ केला. इतकंच नव्हे तर राजेश आणि त्याच्या सहकाऱ्याला हैदराबादला पाठवण्याची व्यवस्था केली आणि खर्चासाठी १० हजार रुपयांची मदत केली. राजेश १४ जुलै रोजी एअर इंडियांच्या विमानाने भारतात परतले.

Recent Posts