loader
Foto

आनंदवार्ता! आणखी एक लस चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात

वॉशिंग्टन: एका बाजूला करोनाचे थैमान सुरू असताना दुसरीकडे मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील अमेरिकेतील मॉडर्ना इंक (Moderna Inc)कंपनीने विकसित केलेली लस आता अंतिम टप्प्याची चाचणी सुरू करणार आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने करोनावरील लशीची चाचणी यशस्वी झाली असल्याचा दावा केला होता. आता अमेरिकेने हा दावा केला आहे. यामुळे करोनाशी दोन हात करणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यानंतर कंपनी मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकेतील मॉडर्ना इंक (Moderna Inc)कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची सुरुवात २७ जुलैपासून सुरू होणार आहे. अमेरिकेतील ८७ ठिकाणी या लशीची चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास ३० हजारजणांना ही लस टोचण्यात येणार आहे. करोनाच्या बचावापासून ही लस किती प्रभावी आहे, याचाही शोध घेण्यात येणार आहे. अमेरिकन सरकारचे संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अॅथोनी फाऊसी यांनी ही चांगली बातमी असून सकारात्मक बातमी मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

याआधी ४५ जणांना लस टोचण्यात आली होती. या सर्वांमध्ये करोनाविरोधात लढण्यासाठी अॅण्टी बॉडीज विकसित झाले असल्याचे समोर आले आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, लस टोचल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये विकसित झालेली अॅण्टी बॉडी ही करोनावर मात केलेल्या रुग्णांसारखीच आहे. डॉ. लीजा जॅक्सन यांनी म्हटले की, हा एक महत्त्वाचा टप्पा असून लस संसर्गापासून बचाव करतो की नाही हे समजणार आहे.

या वर्षाअखेरपर्यंत या लशीच्या चाचणीचे अंतिम ठोस निष्कर्ष समोर येतील असा अमेरिकन सरकारला विश्वास आहे. लस विकसित करण्यासाठी अमेरिकन सरकारने मॉडर्ना कंपनीला मोठ्या प्रमाणावर अर्थ साहय्य केले आहे. पहिल्या दोन टप्प्यातील चाचणीही यशस्वी झाली असल्याचे कंपनीने म्हटले होते. मात्र, या चाचणीशी संबंधित माहिती कंपनीने जाहीर केली नव्हती.

दरम्यान, जगभरातील काही देशांमध्ये लस विकसित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जवळपास १३ लशी क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चीनच्या लशी मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. चीनच्या पाच, ब्रिटन २, अमेरिकेत ३, रशिया, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियात प्रत्येकी एक लस क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात आहेत.

Recent Posts