loader
Foto

नगर: पावसापासून वाचण्यासाठी ते झाडाखाली थांबले अन् घात झाला

नगर: गावी परतत असताना अचानक पाऊस आल्याने झाडाखाली थांबलेल्या व्यक्तीकडील तीन लाख रुपये दोन अज्ञात व्यक्तींनी चोरून नेले आहेत. कर्जत तालुक्यातील चांदा शिवारात ही घटना घडली असून, या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रल्हाद अश्रुबा वणवे (रा. पाटण सांगवी, ता. आष्टी, जि. बीड) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे.

प्रल्हाद वणवे हे ऊस तोडणी मुकादम म्हणून काम करतात. १३ जुलैला ते श्रीगोंदा फॅक्टरी येथून तीन लाख रुपये घेऊन त्यांनी ते आपल्या दुचाकीच्या डिकीत ठेवले आणि ते दुचाकीवरून आपल्या गावी निघाले होते. मात्र चांदा (ता. कर्जत) गावाच्या शिवारातून जात असताना अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे प्रल्हाद वणवे यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून ते झाडाखाली थांबले. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती एका नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून तेथे आले व त्यांनी प्रल्हाद वणवे यांच्या दुचाकी शेजारी आपली दुचाकी लावली. वणवे यांचे दुचाकीकडे लक्ष नसल्याची संधी साधत त्यांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेले तीन लाख रुपये, वेगवेगळ्या बँकेचे पासबुक , चेकबुक चोरून नेले.

पाऊस थांबल्यानंतर प्रल्हाद वणवे हे पुन्हा आपल्या गावाकडे निघण्यासाठी दुचाकीजवळ आले असता, डिकीतून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात काल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक बबन दहिफळे करीत आहेत.

Recent Posts