loader
Foto

दक्षिण अमेरिका: 'या' देशाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाची व्यक्ती

सुरिनाम: दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य किनारपट्टीवर असलेल्या सुरिनाम देशाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे चंद्रिकाप्रसाद तथा 'चन' संतोखी यांची निवड झाली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत संतोखी यांनी देशाचा हुकूमशहा देसी बुटर्स याची राजवट उलथवून टाकली. येत्या गुरुवारी (१६ जुलै) त्यांचा शपथविधी होणार आहे.

संतोखी (वय ६१) पूर्वी देशाचे पोलिस प्रमुख होते. त्यांच्या प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पक्षाने निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला. सध्या विरोधी पक्षनेते असणारे संतोखी आता बुटर्स यांची जागा घेतील. बुटर्स यांच्यावर खून आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप आहेत.

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली देशाची अर्थव्यवस्था, सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार आणि करोना साथ ही संतोखी यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील. सुरिनाम पूर्वी डचांच्या ताब्यात होता. त्यामुळे देशाचा प्रमुख व्यापार नेदरलँड्सबरोबर चालायचा. मात्र, बुटर्स यांच्या राजवटीत हा व्यापार रसातळाला गेला. बुटर्स यांनी चीन आणि व्हेनेझुएला यांच्याशी अधिक जवळीक केली. त्यांच्या आर्थिक आणि राजकीय धोरणांचे अनुकरण केले. आपलं सरकार सत्तेत आल्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती चांगली करण्याचे आव्हान असल्याचे चंद्रिकाप्रसाद तथा 'चन' संतोखी यांनी सांगितले.

संतोखी यांनी पोलीस दलाचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. त्याशिवाय २००५ मध्ये संतोखी यांनी पूर्वी कायदामंत्री म्हणूनही काम केले आहे. सुरिनामची एकूण लोकसंख्या पाच लाख ८७ हजार असून, त्यात भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या २७ टक्के आहे. बॉक्साइटचा व्यापार आणि अलीकडेच सुरिनामच्या हद्दीत सापडलेले तेलसाठे यावरच या देशाचे अर्थकारण अवलंबून आहे.

Recent Posts