loader
Foto

Coronavirus 'या' औषधामुळे करोना आजाराचा धोका कमी; शास्त्रज्ञांचा मोठा दावा

जेरुसलेम: करोनाच्या संसर्गामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. जवळपास २०० देशांमध्ये थैमान घालणाऱ्या करोनाच्या अटकावासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूला लस, औषध विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे करोनाच्या विषाणूवरही संशोधन सुरू आहे. करोनाच्या आजाराचा धोका कमी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलचे औषध प्रभावी ठरू शकते असा दावा इस्रायलच्या संशोधकाने केले आहे.

इस्रायलमधील हिब्रू विद्यापीठाच्या ग्रास सेंटर ऑफ बायोइंजिनियरिंग विभागाचे संचालक प्रा. याकोव नाहमियास यांनी न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई मेडिकल सेंटरमधील बेंजामिन टेनोएवर यांच्यासोबत केलेल्या संयु्क्त संशोधनात हा दावा केला आहे. कोलेस्ट्रॉलविरोधी औषध 'फेनोफायब्रेट' या औषधामुळे करोना आजाराचा धोका कमी करता येऊ शकतो असे त्यांनी सांगितले. करोनाचा विषाणू फुफ्फुसामध्ये जमा होतात. त्यांना दूर करण्यासाठी 'फेनोफायब्रेट' औषध प्रभावी ठरू शकतो असा दावा त्यांनी केला.

नाहमियास यांनी सांगितले की, आम्ही ज्या निष्कर्षावर आलो आहोत, त्याची पुष्टी उपचारांशी निगडीत संशोधनात झाल्यास कोविड-१९ आजाराची जोखीम कमी करता येऊ शकते आणि हा आजार साध्या एखाद्या सर्दीसारखा राहिल असेही त्यांनी म्हटले. संशोधनात, सार्स-सीओवी-२ च्या संसर्गानंतर फुफ्फुसात कशा प्रकारे बदल होतात याचाही अभ्यास करण्यात आला आहे. विषाणू कार्बोहायड्रेट जाळण्यापासून थांबवतो. त्याच्या परिणामी फुफ्फुसांच्या पेशींवर मेद वाढतो. ही परिस्थिती विषाणूच्या वाढीसाठी अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले.

या कारणांमुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलचा आजार असलेल्या नागरिकांना करोनाची बाधा होण्याचा धोका अधिक असतो. 'फेनोफायब्रेट' औषध फुफ्फुसातील पेशींना मेद कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे पेशींवरील करोनाचा विषाणूंची प्रभाव कमी होतो. पाच दिवसांच्या उपचारात करोनाचा विषाणू जवळपास पूर्ण गेला असल्याचा दावा त्यांनी केला. लसीमुळे काही महिनेच बचाव होऊ शकतो. मात्र, करोनावर मात करण्यासाठी विषाणूला शरीरात वाढण्यापासून रोखणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, करोना विषाणूपासून स्वत:ला धोका उत्पन्न होऊ न देणाऱ्या वटवाघुळांच्या प्रतिकारशक्ती समजून घेतली, तर करोनाविरोधातील लस तयार करणे सुलभ होईल, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. वेदनेवर नियंत्रण मिळविण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे ते करोनावर मात करू शकतात, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. ईबोला, रेबीज, नोव्हेल करोनाव्हायरस, सार्स-कोव्ह-२ या विषाणूंचा मानवावर विपरीत परिणाम होत असला, तरी वटवाघुळांवर होत नाही आणि त्याच्या आकाराच्या असलेल्या इतर सस्तन प्राण्यांपेक्षा हे कितीतरी अधिक आयुष्य जगतात,' असे शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन 'सेल मेटाबॉलिझम' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Recent Posts