loader
Foto

इराणचा भारताला धक्का; चाबहार रेल्वे प्रकल्पातून हटवले

तेहरान: सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा देश असणाऱ्या इराणने भारताला मोठा धक्का दिला आहे. इराणमधील चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला इराणने हटवले आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी भारताकडून निधी येणार होता. मात्र, कराराच्या चार वर्षानंतरही हा निधी न आल्यामुळे हा निर्णय घेतला असून हा प्रकल्प स्वत: पूर्ण करणार असल्याचे इराणने म्हटले आहे. इराणच्या या निर्णयामुळे भारताला मोठा कूटनीतिक धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

चाबहार रेल्वे प्रकल्पानुसार, चाबहार बंदरापासून जहेदानपर्यंत रेल्वे मार्ग सुरू करण्यात येणार होता. मागील आठवड्यात इराणचे परिवहन आणि शहर विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी ६२८ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले होते. या रेल्वे मार्ग अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत जाणार आहे. 'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

इराणच्या रेल्वे विभागाने म्हटले की, भारताच्या मदतीशिवायच हा प्रकल्प पूर्ण करणार आहोत. त्यासाठी इराणच्या राष्ट्रीय विकास निधीतील ४० कोटी डॉलरच्या निधीचा वापर करण्यात येणार आहे. याआधी हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील कंपनी पूर्ण करणार होती. हा प्रकल्पामुळे भारताला अफगाणिस्तान आणि अन्य मध्य आशियाई देशांसाठी एक पर्यायी मार्ग देता येणार होता. या प्रकल्पासाठी भारत, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये करार झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये इराणचा दौरा केला होता. त्यावेळी या चाबहार करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या संपूर्ण प्रकल्पासाठी १.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित होती. या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी भारतीय अभियंते इराणलाही गेले होते. मात्र, अमेरिकेच्या निर्बंधाच्या भीतीमुळे या प्रकल्पाचे काम सुरू झाले नसल्याची चर्चा आहे. भारताने याआधीच इराणकडून तेल आयात कमी केली आहे.

Recent Posts