loader
Foto

चीनचेही अमेरिकेला प्रत्युत्तर; अमेरिकी सिनेटरना चीनमध्ये प्रवेशबंदी

बीजिंग: अमेरिका आणि चीनमधील तणाव आता वाढत असल्याची चिन्ह दिसत आहेत. तिबेट मुद्यावरून दोन्ही देशांनी एकमेकांच्या अधिकाऱ्यांना व इतर संबंधितांना व्हिसा बंदी केल्यानंतर आता उइगर मुस्लिमांच्या प्रश्नांवरून दोन्ही देशांमध्ये आता तणाव निर्माण झाला आहे. चिनी अधिकाऱ्यांविरोधात कथित मानवाधिकार उल्लंघनांविरोधात घातलेल्या निर्बंधानंतर चीनने काही अमेरिकन सिनेटरला चीनमध्ये प्रवेश बंदी जाहीर केली आहे.

अमेरिकी सिनेटर मार्को रुबिओ, टेड क्रुझ, प्रतिनिधी ख्रिस स्मिथ आणि धार्मिक स्वातंत्र्यासंदर्भातील दूत सॅम ब्राउनबॅक यांना सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणांवर टीका केल्यामुळे चीनने देशात प्रवेश करण्यावर सोमवारी बंदी घातली. अल्पसंख्य गट आणि लोकांची धार्मिक श्रद्धा या संदर्भात ही टीका होती.

'अमेरिकेच्या या कृतीमुळे चीन आणि अमेरिकेदरम्याच्या संबंधांना हानी पोहोचली आहे. हा चीनच्या राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न असून अमेरिकेची ही कृती म्हणजे चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळढवळ केल्यासारखे आहे. चीन परिस्थितीनुसार याबाबत आणखी कृती करेल,' अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजिअॅन यांनी दिली आहे. चीन सरकार आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी तसेच दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी धार्मिक शक्तींविरूद्ध कारवाई करण्यास कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शिनजियांग, तिबेट आणि अलीकडेच हाँगकाँगशी संबंधित नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्यावर अमेरिकेकडून चीनवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याविरोधात आता चीनही आक्रमक झाला आहे. अमेरिकेच्या कारवाईला प्रत्युत्तर देताना चीनने प्रथमच अमेरिकन राजकारण्यांवर बंदी घातली आहे.

Recent Posts