loader
Foto

जिनपिंग यांच्या आदेशाने शिजला भारताविरोधात 'हा' कट!

बीजिंग: भारत आणि चीन दरम्यान वाढलेल्या तणावाला घेऊन मोठा माहिती समोर आली आहे. चीनच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत प्रवेश केला. चिनी सैन्याच्या या कृतीला राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीच होकार दिला असल्याचे समोर आले आहे. चीनमधील वृत्तसंस्था शिन्हुआनेदेखील आपल्या वृत्तात शी जिनपिंग यांनी वर्षाच्या सुरुवातीला आपल्या आदेशात 'सैन्य प्रशिक्षणा'साठी सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले आहे.

'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या हद्दीतील गलवान खोरे, पँगोग सरोवर आणि लडाखमधील इतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चीनच्या सैन्याने केलेली घुसखोरी ही काही महिन्यांच्या तयारीनंतर केली आहे. शी जिनपिंग यांनी आदेश दिल्यानंतर घुसखोरीची तयारी झाली असल्याचे म्हटले आहे. चीनने एकाच वेळी अनेक ठिकाणी सैन्याची संख्या वाढवली, ही कृती एका नियोजनाचा भाग होता. यामुळेच भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये संघर्ष झाला आणि त्यात २० भारतीय जवान शहीद झाले.

वरिष्ठ पातळीवर नियोजन आणि समन्वय, भारताला धक्का?
भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, गलवान खोरे व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या हालचाली आणि घटनाक्रम पाहता या घुसखोरीचे
वरिष्ठ पातळीवर नियोजन आणि समन्वय ठेवण्यात आला असल्याची शक्यता आहे. गलवान खोरे आणि पँगोग सरोवर परिसरातून भारतीय सैन्याला अधिक मागे ढकलल्यास चीनला अधिकाधिक भागावर दावा सांगता येऊ शकतो. भारत आणि चीन दरम्यान गलवान खोऱ्यात अल्प काळासाठी बनवण्यात आलेला बफर झोन हा चीनच्या नव्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दाव्यासह तयार करण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा एक भाग पश्चिमेकडे गेला आहे.

पँगोग सरोवर परिसरातून चिनी सैन्य फिंगर ४ मधून मागे हटले असले तरी फिंगर ५ वर अद्यापही ठाण मांडून आहेत. याआधी भारतीय सैन्य फिंगर ८ पर्यंत गस्त घालत होते. फिंगर ८ ते फिंगर ४ पर्यंतचे अंतर हे जवळपास आठ किमी पर्यंतचे आहे. शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर चिनी सैन्याने लडाख जवळील शिनजियांग प्रांतात सैन्य प्रशिक्षणाच्या नावाखाली सैन्याची जमवाजमव सुरू केली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अभ्यास सुरू
यावर्षी चीनच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ येऊन सैन्य युद्ध सराव केला. त्यामुळेच या भागात मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव सुरू झाली. जिनपिंग यांनी जानेवारी महिन्यातच ट्रेनिंग मोबिलायझेशनच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. या प्रशिक्षणात सैन्याला युद्धजन्य परिस्थितीत अधिक सक्षम करण्याचा हेतू असल्याचे आदेशात म्हटले असल्याचे चीनमधील 'शिन्हुआ' या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

चीनने नाट्यमय पद्धतीने फक्त आपल्या युद्धजन्य परिस्थितीतील सरावाला बदलले नाही तर जपान, दक्षिण चीन समुद्र आणि तैवानच्या सीमेवर अधिक प्रमाणावर सैन्य जमवले असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनकडून अशा प्रकारचे कृत्य येणाऱ्या काळातही होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Recent Posts