loader
Foto

'चीनविरोधात ट्रम्प भारताला मदत करतील याची खात्री नाही'

वॉशिंग्टन: भारत आणि चीन दरम्यान तणाव वाढत असताना अमेरिकेकडून भारताला मदत देण्याचे आश्वासन राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी दिले आहे. चीनविरोधात आणि भारताच्या समर्थनात अमेरिकेने अनेक वक्तव्ये केले. असे असले तरी अमेरिकेकडून भारताला मदत मिळेल याची काहीही ठोस खात्री देता येणार नसल्याचे अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, चीन आपल्या सीमेलगत असलेल्या देशांसोबत सीमा प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत आहे. चीनचे भारत, जपान आणि अन्य देशांसोबत त्यांचे संबंध खराब झाले असल्याचे निश्चित आहे. ट्रम्प हे चीनसोबतच्या संबंधांना व्यापार संबंधाच्यादृष्टीने पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ट्रम्प हे भारताला कितपत पाठिंबा देतील, या प्रश्नाला उत्तर देताना जॉन बोल्टन यांनी ट्र्म्प यांच्याबाबत खात्री देता येणार नसल्याचे सांगितले. ट्रम्प हे नोव्हेंबरमधील निवडणुकीनंतर काय करतील, हे सांगता येणार नाही. कदाचित चीनसोबतच्या व्यापार करारावर भर देण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि चीन दरम्यान तणाव वाढल्यास ट्रम्प चीनविरोधात भारताला पाठिंबा देतील यांची खात्री देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
 

पुढे त्यांनी म्हटले की, आगामी चार महिने ट्रम्प यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे निवडणुकीत कोणतीही अडचण होईल, असा निर्णय ट्रम्प घेणार नाहीत. करोनामुळे आधीच ट्रम्प यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे भारत-चीन सीमेवर सध्या तरी शांतता असावी अशी त्यांची इच्छा असणार, असा अंदाज बोल्ट यांनी व्यक्त केला. ट्रम्प प्रशासनात एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१९ दरम्यानच्या काळात बोल्टन अमेरिकेचे मुख्य सुरक्षा सल्लागार होते.

दरम्यान, करोनाचा संसर्ग अमेरिकेत वेगाने फैलावल्यानंतर ट्रम्प यांनी चीनवर सातत्याने आरोप करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोन्ही देशांमधील संबंध अधिकच तणावपूर्ण झाले. आता, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनविरोधात आणखी कठोर भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. ट्रम्प यांची माध्यम सचिव कायली मॅकनेनी यांनी सांगितले की, चीनवर होणाऱ्या कारवाईबाबत आम्ही इतक्याच काही सांगणार नाही. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याबाबत लवकर घोषणा करतील असे त्यांनी सांगितले. मागील १५ दिवसांत अमेरिकेने चीनला दणका देणारे ९ निर्णय घेतले आहेत. त्यामुळे चीन आणि अमेरिकेतील संबंध अधिकच तणावपूर्ण झाले आहेत. हाँगकाँग सुरक्षा कायद्याच्या मुद्यावर अमेरिकेने आता चीनविरोधात आघाडी उघडली आहे.

Recent Posts