loader
Foto

'हा' आजार असलेल्या रुग्णांना करोना मृ्त्यूचा अधिक धोका!

बीजिंग: जगभरात करोना संसर्गाचा हाहाकार सुरू आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना करोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने संशोधनही करण्यात येत आहेत. एका संशोधनानुसार, रक्तात मधुमेहाचे प्रमाण अधिक असणाऱ्या रुग्णांचा करोना आजारामुळे मृत्यू होण्याचा अधिक धोका असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय या रुग्णांमध्ये इतर आजाराचाही धोका बळावतो.

'डायबिटोलॉजिया' या नियताकालिकेत प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, संशोधनकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर फास्टींग ब्लड ग्लुकोज (एफबीजी) स्तर आणि आधीपासून मधुमेहाचे निदान न करता कोविड-१९ बाधित रुग्णांच्या २८ दिवसांच्या मृत्यू दराच्या संबंधांचा अभ्यास केला. दोन रुग्णालयातील रुग्णांच्या अभ्यासानंतर या संशोधनात करोनाबाधितांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्याची शिफारस करण्यात आली आहे. रुग्णांना मधुमेहाचा आजार नसतानाही ही चाचणी करण्यात यावी असे संशोधनात म्हटले आहे. करोनाबाधित रुग्णांमध्ये ग्लुकोज मेटाबोलिक संबंधी आजार अधिक असण्याची शक्यता आहे.

या संशोधनात ६०५ रुग्णांचा समावेश करण्यात आला. यातील ११४ रुग्णांचा रुग्णालयातच मृत्यू झाला. यामध्ये ३२२ पुरुष रुग्णांचा समावेश होता. यातील बहुतांशी रुग्णांना उच्च रक्त मधुमेहाचा आजार असल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, जवळपास मागील सहा महिन्यांपासून करोनाच्या संसर्गाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरातील २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग पसरला आहे. करोनाच्या संसर्गामुळे जगाच्या अर्थचक्रावर परिणाम झाले असून मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत जवळपास ३.८ ट्रिलियन डॉलर खर्च करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. जर्मनीच्या जीडीपी एवढे नुकसान करोनामुळे झाले आहे. हा आकडा आणखी वाढणार असल्याचाही भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Recent Posts