loader
Foto

Volkswagen कार सॉफ्टवेअरमध्ये झोल! फोक्सवॅगनला आणखी एक झटका

बर्लिन: प्रदूषण चाचण्यांमध्ये फसवणूक करण्यासाठी फोक्सवॅगन कंपनीने त्यांच्या गाड्यांमध्ये बसवलेल्या सॉफ्टवेअरविरोधात ग्राहकाला आता युरोपीयन समुदायातील ज्या देशात ही गाडी खरेदी केली, तिथेच दाद मागता येणार आहे. त्यासाठी आता जर्मनीमध्ये धाव घेण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल गुरुवारी युरोपीय महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला.

सन २०१५मध्ये अमेरिकेत फोक्सवॅगनने प्रदूषण चाचण्यांमधून पास होण्यासाठी आपल्या हजारो गाड्यांमध्ये फेरफार केल्याचे समोर आले होते. त्यानंतर कंपनीला अब्जावधी युरोंचा दंड आणि नुकसानभरपाई द्यावी लागली होती. ऑस्ट्रियातील ५७४ ग्राहकांच्या वतीने त्या देशातील ग्राहक संरक्षण गटातर्फे क्लागेनफर्टच्या न्यायालयाकडून युरोपीयन समुदायाच्या सर्वोच्च न्यायालयाला या संदर्भात सुनावणीबाबत विनंती करण्यात आली होती. जर्मनीस्थित फोक्सवॅगन कंपनीने ऑस्ट्रियामधील आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग केला असल्याचे युरोपीयन समुदायाच्या न्यायालयाने स्पष्ट केले.

 

युरोपीय महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ज्या देशातून गाड्या खरेदी करण्यात आल्या, त्याच देशात त्यांच्यात दोष असल्याचे निदर्शनास आले आहे. युरोपीयन समुदायातील एका देशातील या कंपनीने समुदायातील अन्य सदस्य देशातील ग्राहकांना आपले उत्पादन विकले असून, या उत्पादनात जाणीवपूर्वक फेरफार केली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या देशातील न्यायालयांत दाद मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

दरम्यान, फोक्सवॅगन कंपनी आगामी काही वर्षांमध्ये पेट्रोल, डिझेल कारचे उत्पादन हळूहळू कमी करणार आहे. वर्ष २०२६ मध्ये या कारचे उत्पादन पूर्णत: बंद होणार असून त्यानंतर कंपनी केवळ इलेक्ट्रीक कार विकणार असल्याचे संकेत कंपनीने मागील वर्षी दिले होते. जगभरात इंधन साठ्यांची कमतरता आणि प्रदूषण या समस्यांमुळे बहुतांशी देश इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे वाहन कंपन्यांनीही विजेवर धावणाऱ्या कार निर्मिती करण्याकडे लक्ष दिले आहे. इलेक्ट्रीक कारच्या निर्मितीसाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक कंपनीकडून करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

 

Recent Posts