loader
Foto

India China चीनची भारताविरोधात कारवाई सुरूच; अरुणाचलकडे लक्ष वळवले!

बीजिंग: आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या चीनने आता आपले लक्ष अरुणाचलकडे वळवले आहे. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ रस्ते बांधण्यास भारताला रोखणारा चीन आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर रस्ते तयार करत असल्याचे समोर आले आहे. यासाठी चीन सर्व प्रकारच्या भागात काम करण्यास सक्षम असलेल्या साधनांचा वापर करीत आहे. या यंत्रांना 'स्पायडर एक्स्ववेटर' असेही म्हटले जाते.

ब्रम्हपुत्र नदीजवळ हा रस्ता बनवला जात असून या मार्गातून भारतात प्रवेश केला जातो. 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, पीएलएच्या तिबेट मिलिट्री डिस्ट्रिक्ट व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओनुसार, ब्रम्हपुत्र नदीजवळ चिनी सैनिक अतिशय वेगाने रस्तेबांधणीचे काम करत आहेत. या कामात 'स्पायडर एक्स्ववेटर' वापरण्यात येत असून त्याच्या वापराने डोंगराळ भागात रस्ते सहजपणे तयार करता येतात. चीनमध्ये ब्रह्मपुत्र नदीला यार्लंग नदी म्हणतात.

चीनी सैन्य भारताला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पायाभूत सुविधा जलदगतीने उभारत आहे. भारतही चीनच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून या भागात रस्ते आणि पायाभूत सुविधासुद्धा विकसित करत आहे. त्यामुळे अनेकदा दोन्ही देशांमध्ये वाद होत असतात. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारताने बांधकाम करण्यास सुरुवात केल्यानंतर चीनने त्यावर आक्षेप घेतला. लडाखच्या आधी डोकलाममध्ये ही असाच वाद झाला होता.

तवांगसह अरुणाचल प्रदेशवर आपला दावा करत आलेला आहे. हा प्रदेश तिबेटचाच एक भाग असल्यामुळे आमचा दावा असल्याचा दावा चीनकडून सातत्याने करण्यात आलेला आहे. अरुणाचल प्रदेशमधील सीमा भाग हा अतिशय संवेदनशील समजला जातो. गलवानमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्यानंतर चीन अरुणाचल प्रदेशमध्येही घुसखोरी करू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता. चीनच्या बाजूने अरुणाचलमध्ये हालचाल वाढवली असल्याचे वृत्त होते.

दरम्यान, पँगाँग सरोवराजवळ फिंगर ४ परिसरात चीनी सैन्याकडून हालचाली दिसत असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. या परिसरातून चीनने आपल्या गाड्या आणि तंबू हटवले आहेत. मात्र रिज लाइनवर अजूनही चीनी सैन्य उपस्थित आहे. या पूर्वी फिंगर ४ च्या पुढे भारतीय सैनिक पेट्रोलिंग करत असत. मात्र फिंगर ४ परिसरात चीनी सैनिकांच्या उपस्थितीनंतर भारतीय सैनिक या भागात पेट्रोलिंग करू शकत नसल्याचे समोर आले आहे.

३० जून रोजी भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेमध्ये गलवान खोरे, हॉट स्प्रिंग, पँगाँग त्सो आणि गोगरा येथील तणाव कमी करण्यासाठी एका सूत्रावर सहमती झाली होती. त्यानंतर बुधवारी चीनने हलवान खोऱ्यातून आपले सैन्य मागे घेतल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर आता हॉट स्प्रिंगमधून देखील सैनिक दोन किलोमीटर मागे हटले आहेत. आता दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये दोन किमीपर्यंत मागे हटण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आता शुक्रवारपर्यंत गोगरा १७ ए या पेट्रोलिंग पॉइंटवरून तेथील सैन्य दोन किमी मागे हटवण्यात येईल अशीही माहिती मिळत आहे.

Recent Posts