loader
Foto

नेपाळ: पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्यासाठी 'प्रचंड' दबाव; बचावासाठी चीन सरसावले!

काठमांडू: भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासमोरील राजकीय संकट अधिकच गडद होत असून पंतप्रधानपदाच्या राजीनाम्यासाठी पक्षातंर्गत दबाव वाढू लागला आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी ओलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला ओलींच्या बचावासाठी चीनने हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे. चीनच्या राजदूतांनी नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांची भेट चर्चा केली असल्याचे वृत्त आहे.

नेपाळने भारताच्या भूभागावर दावा करणारे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर नेपाळमधील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात दोन गट निर्माण झाले असून भारतविरोधी भूमिका घेतल्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते पुष्प कमल दहल 'प्रचंड' नाराज असल्याचे समोर आले. पक्षाच्या बैठकीत ओली यांच्यावर अनेकांनी प्रश्नांची सरबती करत राजीनाम्याची मागणी केली. मात्र, ओली यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर नेपाळमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला. रविवारी प्रचंड आणि ओली यांच्यात बैठक पार पडली. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. चीनच्या राजदूत हाओ यांकी यांनी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माधव नेपाळ यांची रविवारी रात्री भेट घेतल्याचे वृत्त असून ओली यांना पाठिंबा देण्याची मागणी केले असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. माधव नेपाळ हे प्रचंड यांच्या गटाचे समजले जातात.

चीनच्या राजदूत हाओ यांकी यांनी नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे. चीनच्या हस्तक्षेपानंतर आता ओली यांच्यावरील राजकीय संकट ८ जुलैपर्यंत टळले असल्याचे म्हटले जाते. रविवारी, प्रचंड आणि पंतप्रधान यांच्यात झालेल्या बैठकीत काहीच निर्णय झाला नाही. ओली यांनी पंतप्रधानपदाचा आणि पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रचंड यांनी केली आहे.

दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी विरोधी पक्ष नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांची भेट घेतली. कम्युनिस्ट पक्षातंर्गत फूट पडल्यास विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसने पाठिंबा द्यावा अशी गळ ओली यांनी घातली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या बैठकीची माहिती अधिकृतपणे समोर आली नाही. नेपाळचे पंतप्रधान शर्मा ओली आपली सत्ता वाचवण्यासठी सर्व प्रयत्न करत असून पक्षांतर कायद्यावर अध्यादेश आणणार असल्याची चर्चा आहे.

Recent Posts