loader
Foto

डोळ्यांदेखत ३ नातींवर बलात्कार; हादरलेल्या ७१ वर्षीय आजीने...

जोहान्सबर्ग: घरात घुसून काही जणांनी ७१ वर्षांच्या आजीसमोरच तीन नातींवर बलात्कार केल्याची घटना दक्षिण आफ्रिकेतील क्वाजुलू-नताल प्रांतात घडली. नातींवरील अत्याचाराची घटना डोळ्यांदेखत पाहणाऱ्या आजीला धक्का सहन न झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

क्वाजुलू - नताल प्रांतात घडलेल्या या बलात्काराच्या घटनेने देशभरात खळबळ माजली आहे. काही लोक ७१ वर्षीय महिलेच्या घरात घुसले. त्यांनी तिच्या तीन नातींवर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे नातींवर बलात्कार होत असताना या वृद्धेला जबरदस्तीने समोर बसवले होते. डोळ्यांदेखत नातींवर बलात्कार होत असल्याचा वृद्धेला मोठा धक्का बसला. तो सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तिचा मृत्यू झाला.

डेली मेलच्या वृत्तानुसार, घरात किती लोक घुसले होते याची माहिती मिळू शकली नाही. तर पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार, बलात्कार करणारी एकच व्यक्ती होती. त्यांनी अनुक्रमे १९, २२ आणि २५ वर्षाच्या तीन मुलींना एका खोलीत बंद केले. त्यानंतर ७१ वर्षीय महिलेला या खोलीत फरफटत घेऊन आले. तिला एका खुर्चीला बांधले. त्यानंतर एका आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून आळीपाळीने तिन्ही मुलींवर बलात्कार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, डोळ्यांदेखत नातींवर बलात्कार होत असल्याचे पाहून आजीला धक्का बसला. ती बेशुद्ध पडली. यानंतर तिचा मृत्यू झाला.

हृदयविकाराने वृद्धेचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून आरोपींनी हे कृत्य केले असावे. कारण घरातील कुठलीही वस्तू चोरीला गेली नाही. मुलींना मारहाण आणि त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलीस प्रवक्ते नाकोबिल ग्वाला यांनी सांगितले की, आरोपी नेमके किती आणि कोण होते हे अद्याप कळू शकलेले नाही. हल्लेखोराने कपड्याने चेहरा झाकलेला होता. घटनेवेळी आजी बेशुद्ध पडली होती, असे पीडितांनी सांगितले.

मुलींचे वडील घरी पोहोचले त्यावेळी त्यांना घडलेल्या घटनेबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. या घटनेनंतर दक्षिण आफ्रिकेत खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. दोषींना लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाही सरकारने दिली आहे.

Recent Posts