loader
Foto

भारताविरोधात दोन आघाड्यांवर युद्धाचा चीन-पाकिस्तानचा कट?

इस्लामाबाद: लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जवळपास २० हजार सैन्य तैनात केले असल्याचे वृत्त आहे. भारतावर दवाब टाकण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. चीनच्या इशाऱ्यावरून पाकिस्तान लष्कराने ही कृती केली असल्याचे म्हटले जात आहे.

'इकॉनॉमिक्स टाइम्स'च्या वृत्तानुसार, लडाखमध्ये घुसखोरी केल्यानंतर भारतावर दबाव टाकण्यासाठी चीनच्या अधिकाऱ्यांची काश्मीर खोऱ्यात हिंसाचार करण्यासाठी अल बदर या कट्टरतावादी संघटनेशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या वादावर पाकिस्तान आणि चीन एकत्र आले असल्याची चर्चा आहे. त्यातूनच पाकिस्तानने काश्मीरच्या पश्चिम भागात २० हजार सैनिकांना तैनात केले आहे. त्याशिवाय, पाकव्याप्त काश्मीरमधील रुग्णालयात जवानांवर उपचार करण्यासाठी काही खाटा राखीव ठेवण्याचे आदेश लष्कराने दिले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाकोट एअर स्ट्राइकनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर जेवढे सैन्य पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केलेल्या सैन्यांपेक्षा अधिक सैन्य तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय, पाकिस्तानच्या एअर डिफेन्सनेही या भागावर २४ तास देखरेख ठेवण्यास सुरुवात केली आहे. काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य तैनाती करून पाकिस्तान आणि चीनकडून भारतावर दवाब बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

मागील काही दिवसांत चीन आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये काही बैठका पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानने आपले २० हजारांहून अधिक सैन्य तैनात केले आहे. या भागात पाकिस्तानच्या स्कर्दू विमानतळावर चीनचे एअर रिफ्युलिंग एअरक्राफ्ट उतरले असल्याचे वृत्त होते.

चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने स्पाइस बॉम्ब खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. भारत खरेदी करणार असलेल्या 'स्पाइस-२०००' हा काही क्षणात शत्रूंची इमारत आणि बंकराला उद्धवस्त करू शकतो.

दरम्यान, मागील काही वर्षांत चिनी कंपन्यांनी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरचेही काम सुरू आहे. या कंपन्यांच्या आडून चीन पाकिस्तानचा भारताविरोधात वापर करण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील जैसलमेरच्या घोटारू सीमेजवळ २५ किमीच्या अंतरावर खरेपूर येथे हवाई तळ निर्माण करण्यात आला आहे. मागील काही दिवसात चिनी सैन्यांची संख्या या ठिकाणी वाढली आहे.

Recent Posts