loader
Foto

China विमानतळ ते बंकरचे बांधकाम; भारताविरोधात चीनकडून पाकिस्तानचा वापर?

इस्लामाबाद: लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून भारतविरोधी कारवाई सुरू आहे. त्यातच आता चीनने भारताविरोधात पाकिस्तानची मदत घेत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या भुमीवर चीनचे सैन्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनने काश्मीर ते गुजरातपर्यंतच्या सीमेवर आपले सैन्य दाखल केले असल्याची चर्चा आहे.

मागील काही वर्षांत चिनी कंपन्यांनी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरचेही काम सुरू आहे. या कंपन्यांच्या आडून चीन पाकिस्तानचा भारताविरोधात वापर करण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील जैसलमेरच्या घोटारू सीमेजवळ २५ किमीच्या अंतरावर खरेपूर येथे हवाई तळ निर्माण करण्यात आला आहे. मागील काही दिवसात चिनी सैन्यांची संख्या या ठिकाणी वाढली आहे. या हवाई तळावर मिग-२१ च्या समकक्ष असणाऱ्या चेनगुड जे-७, जेएफ-१७ लढाऊ विमाने, वाई-८ रडार आणि इतर अत्याधुनिक उपकरणे असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. त्याशिवाय बाडमेरमध्ये मुनाबावसमोर थारपारकरमध्ये चीनचे सैन्य विमानतळ बनवत असल्याची चर्चा आहे. हे विमानतळ भारतीय सीमेपासून २५ किमी अंतरावर आहे. त्याशिवाय, गुजरातला लागून असलेल्या सीमेवरदेखील मिठी भागात विमानतळ बांधकाम सुरू आहे.

चीन-पाकिस्तान कॉरिडोर प्रकल्पातून रेल्वे मार्ग सुरू करण्यात येणार आहे. पाकिस्तानने नव्याने बनत असलेले विमानतळ व रेल्वेचा वापर चीनमधील गॅस व ऑईल कंपनी करणार असल्याचे म्हटले आहे. कराची विमानतळापासूनचे हे अंतर अधिक असल्यामुळे वेळ जातो. वेळेच्या बचतीसाठी हे प्रकल्प सुरू असल्याचे म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पीरकमाल आणि चोलिस्तानमध्ये मोठ्या संख्येने चिनी सैन्य दिसले आहेत. वर्षोनुवर्षे चिटपाखरूही न दिसणाऱ्या वाळवंटात चीनची वाढती दखल भारतासाठी डोकेदुखी होऊ शकते. त्याशिवाय, कराची, जकोकाबाद, क्वेटा, रावळपिंडी, सरगोडा. पेशावर, मेननवाली आणि रिशालपूरमधील हवाईतळ चीन अत्याधुनिक करत असल्याची माहिती आहे.

चीनने पाकिस्तानी सैन्याला बंकर बनवण्यासाठीही मदत केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत ३५० हून अधिक बंकर पाकिस्तानने बनवले असल्याची माहिती आहे. हे बंकर दिसू नये याची खबरदारी घेण्यात आली असून विशिष्ट प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. त्याशिवाय, चीन पाकिस्तान सैन्याला मदत ठरू शकेल अशी पायाभूत सुविधाही निर्माण करत आहे.

राजस्थानमधील पाकिस्तान सीमाभागात चीनच्या ३० हून अधिक कंपन्या तेल आणि गॅस साठ्याच्या शोधात आहेत. भारत-पाकिस्तान सीमा भागात अनेक चिनी कंपन्यांनाचा ताबा आहे. थारच्या वाळवंटात चीनने आपला मोठा तेल आणि गॅसचा प्रकल्प सुरू केला आहे. त्याशिवाय, मेघानभीट, चैकी, शॉन तौरुजी भीट, खिप्रो, इस्लामकोट मीर, सांगद, बदीन आदी भागांमध्ये चीनमधील कंपनी तेल आणि गॅसचे उत्पादन करत आहेत. पाकिस्तान सीमा भागातील घोटारू क्षेत्रात २००५-०६ पासून तेलसाठे शोधण्यास सुरुवात केली होती. जानेवारी २०१७ मध्ये या ठिकाणी नवीन तेल आणि गॅस साठे सापडल्यानंतर उत्पादन सुरू करण्यात आले.

Recent Posts