loader
Foto

India China चीनकडून भारताचा विश्वासघात? 'या' ठिकाणी सैन्याची जमवाजमव

बीजिंग: लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या हिंसाचारानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला होता. हा तणाव निवळण्यासाठी सैन्य मागे घेणार असल्याचे चीनने म्हटले होते. मात्र, चीनच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असल्याचे याआधीही दिसून आले आहे. आता पु्न्हा एकदा हीच परिस्थिती असल्याचे दिसून आले आहे. पँगोंग त्सो तलावाजवळ चीनने आपली कुमक वाढवली असल्याचे समोर आले आहे.

ओपन सोर्स इंटेलिजेंस अॅनालिस्ट Detresfa ने नवीन सॅटेलाइट इमेज जारी केले आहेत. या सॅटेलाइट इमेजनुसार, चीनची पीपल्स लीबरेशन आर्मीने पँगोंग त्सो तलाव परिसरात अजून ठाण मांडले आहे. इतकेच नव्हे तर हळूहळू चीनची सैन्य लहान गटांद्वारे वाढत आहे. पँगोंग त्सो तलावापासून दक्षिणेकडील भागात १९ किमी अंतरावर चीनची सैन्याची जमवाजमव दिसून आली आहे. एकदाच मोठ्या संख्येने येण्याऐवजी चिनी सैन्य लहान गट करून जमा होत आहेत. ही सैन्य वाढ जाणीवपूर्वक करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर चीनने दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहमती झाली असल्याचे म्हटले होते. मंगळवारी झालेल्या चर्चेत लडाखमध्ये तणाव कमी झाला असल्याचे चित्र होते.
 

भारत-चीन लष्करी बैठकीत काय झाले?
दरम्यान. पूर्व लडाखमधून सैनिकांना हटवण्याबाबतच्या कार्यवाहिला अंतिम रूप देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) ५ मेच्या पूर्वी जशी स्थिती होती तशीच स्थिती आताही असावी असे भारताने या चर्चेदरम्यान चीनसमोर स्पष्ट केले. याचाच अर्थ चीनी सैन्याने माघारी जावे असेच भारताने स्पष्ट शब्दात चीनला सांगितले. दोन्ही पक्षांदरम्यान, त्याच जागी ६ जून या दिवशी दोन्ही देशांदरम्यान लेफ्टनंट जनरल स्तरावरील पहिली बैठक पार पडली होती. त्या बैठकीत दोन्ही पक्षांमधील समस्या दूर करण्यासाठी एक करार करण्यात आला. तथापि, १५ जूनला झालेल्या हिंसक घटनेनंतर सीमेवरील परिस्थिती बिघडली होती.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ताणावाच्या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल स्तरावर चर्चा झाली. भारतीय पक्षाचे नेतृत्व १४व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांनी केले. तर, चीनी पक्षाचे नेतृत्व तिबेट मिलिटरी डिट्रिक्टचे कमांडरने केले. एलएसीवर दुसरीकडे चीनच्या भागात मोल्डो परिसरात दोन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांदरम्यान बैठक झाली. ही बैठक सुमारे १२ तास चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या कोअर कमांडर स्तरावरील बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर सहमती झाली. तणाव असलेल्या क्षेत्रात दोन्ही पक्षांनी आपले सैन्य हटवण्यावर सहमती दर्शवली. पूर्व लडाखमधील ज्या-ज्या ठिकाणी समस्या आहे तेथे सैन्य कसे मागे घेतले जाणार यासंदर्भातील प्रक्रियेवर चर्चा झाली.

Recent Posts