loader
Foto

मॉस्कोत व्हिक्ट्री डे परेड; भारतीय सैन्य दलाचे शानदार संचलन

मॉस्को: दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांनी मिळवलेल्या विजयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रशियाची राजधानीत मॉस्कोमध्ये शानदार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मॉस्कोमध्ये लष्कराच्या संचलनाचे आयोजन करण्यात आले असून भारतीय लष्करानेही यामध्ये सहभाग घेतला आहे. परदेशी भूमीवर भारतीय जवानांनी तिरंगा झेंड्यासह संचलनात सहभाग घेतला.

या विजय दिवसाच्या संचलनात रशियाने आपले लष्करी सामर्थ्य दाखवले. राष्ट्राध्यक्ष व्लामदिर पुतिन यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील रशियात उपस्थित आहेत. त्यांनी रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव यांच्यासोबत द्विपक्षीय संरक्षण संबंधांवर चर्चा केली. रशियन उपपंतप्रधान बोरिसोव यांनी राजनाथ सिंह यांची हॉटेलमध्ये भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये असणारे मैत्रीपूर्ण संबंध आणखी घट्ट होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारताच्या सगळ्याच प्रस्तावांवर रशियाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले.

मॉस्कोमध्ये संरक्षण मंत्री आणि चीनचे मंत्री वेई फेंगे यांच्यात कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, दोघेहीजण विजय दिवसाच्या लष्करी संचलनात सहभागी होणार आहेत. आपल्या या रशिया दौऱ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रशियाच्या तसेच इतर देशांच्या नेत्यांना भेटणार आहेत. भारत-चीन या दोन्ही देशांंमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या रशिया दौऱ्याचे महत्त्व वाढले आहे.

दरम्यान, भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी बैठक झाली. पूर्व लडाखमधून सैनिकांना हटवण्याबाबतच्या कार्यवाहीला अंतिम रूप देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) ५ मेच्या पूर्वी जशी स्थिती होती तशीच स्थिती आताही असावी असे भारताने या चर्चेदरम्यान चीनसमोर स्पष्ट केले. याचाच अर्थ चीनी सैन्याने माघारी जावे असेच भारताने स्पष्ट शब्दात चीनला सांगितले. दोन्ही पक्षांदरम्यान, त्याच जागी ६ जून या दिवशी दोन्ही देशांदरम्यान लेफ्टनंट जनरल स्तरावरील पहिली बैठक पार पडली होती. त्या बैठकीत दोन्ही पक्षांमधील समस्या दूर करण्यासाठी एक करार करण्यात आला. तथापि, १५ जूनला झालेल्या हिंसक घटनेनंतर सीमेवरील परिस्थिती बिघडली होती.

Recent Posts