loader
Foto

India China लडाख ते अरुणाचल सीमेवर चीनचे लढाऊ विमान तैनात

बीजिंग: भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढल्यानंतर दोन्ही देशांनी आपले सैन्य अधिक सज्ज ठेवण्यावर भर दिला आहे. भारतीय हवाई दलाने मिग-२९ आणि अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर सज्ज ठेवल्यानंतर आता चीनने लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर लढाऊ विमाने सज्ज ठेवली असल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे तर भारतीय सैनिकांची गस्त थांबवण्यासाठी पेंगाँग सो सरोवराजवल चीनने आक्रमकपणे देखरेख वाढवली आहे.

'दि ट्रिब्युन'ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने भारताच्या सीमेलगत असलेल्या होटाना, नग्यारी, शिगात्से आणि नयिंगची या ठिकाणच्या हवाई तळावर अतिरिक्त लढाऊ विमाने, बॉम्बर आणि लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. त्याशिवाय चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. पेगाँग सो सरोवराजवळ चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्याशिवाय चीनने गोगरा हॉट स्प्रिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहेत. चीनच्या या हालचालींमुळे भारताच्या देपसांग, मुर्गो, गलवान, हॉट स्प्रिंग, कोयूल, फुकचे आणि देमचोक या भागांमध्ये धोका वाढला आहे. त्याशिवाय दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये आज बैठक पार पडणार आहे. त्याआधी ६ जूनला देखील अशीच बैठक पार पडली होती.

 

चीनने उंच ठिकाणी उड्डाण घेण्यास सक्षम असलेल्या जे-११ आणि जे-१६ एस या लढाऊ विमानांना लडाखच्या सीमावर्ती भागात तैनात केले आहे. चीनचा शेययांग जे ११ हे लढाऊ विमान रशियाच्या सुखोई एसयू २७ ची चिनी व्हर्जन आहे. या लढाऊ विमानाची निर्मिती चीनमध्येच करण्यात आली असून फक्त चिनी हवाई दलाकडून याचा वापर होतो. हे लढाऊ विमान ३३ हजार किमी वजन वाहू नेण्यास सक्षम आहे.

मागील आठवड्यात १५ जूनच्या रात्री भारत-चीनच्या सैन्यामध्ये हिंसाचार झाला होता. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. चीनच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी भारतीय हवाई दलानेही जोरदार तयारी केली आहे. भारतीय हवाई दलाने चीनला लागून असलेल्या ३५०० किमी सीमेवरील हवाई तळांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, जगभरातील अनेक देश करोनाशी दोन हात करत असताना चीनने आक्रमक विस्तारवादी धोरण अवलंबले असल्याचे चित्र आहे. दक्षिण चीन समुद्रात वर्चस्व मिळवण्यासाठी चीनने इतर शेजारच्या देशांवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. तैवानच्या अखत्यारीत असणाऱ्या बेटावर बळजबरीने ताबा मिळवू अशी धमकी दिल्यानंतर दक्षिण चीन समु्द्रात अमेरिकन नौदल दाखल झाले आहेत. भारतासोबत हिंसाचाराची घटना ताजी असतानाच आता चीनने पूर्व चीन समुद्रातील बेटावर आपला दावा सांगितला आहे. सध्या हे बेट जपानच्या ताब्यात असून सेनकाकू आणि चीनमध्ये डियाओस या नावाने ओळखले जाते.

 

Recent Posts